प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
prasad.kulkarni65@gmail.com
सोमवार ता.२५ सप्टेंबर २०२३ रोजी बॅरिस्टर नाथ पै यांचा १०१ वा जन्मदिन आहे. बॅरिस्टर नाथ पै हे भारतीय राजकारणातील एक वादळी व्यक्तिमत्व होते. थोर स्वातंत्र्यसैनिक ,प्रसिद्ध संसदपटू,नामवंत घटना तज्ञ, कोकण रेल्वेचे शिल्पकार , दशसहस्त्रेशू वक्ता अशा विविध अंगाने त्यांची व्यापक ओळख होती. केवळ ४९ वर्षाचे आयुष्य लाभलेल्या बॅरिस्टर नाथ पै यांनी अल्प आयुष्यात डोंगराएवढी कामे केली. २५ सप्टेंबर १९२२ रोजी वेंगुर्ला येथे जन्मलेले बॅरिस्टर नाथ पै १८ जानेवारी १९७१ रोजी बेळगाव येथे कालवश झाले.संस्कृत,मराठी, इंग्रजी इत्यादी भाषांवर बालवयातच त्यांनी प्रभुत्व मिळवले होते. वेंगुर्ल्यात शिक्षण झाल्यावर त्यांनी लंडन येथे जाऊन बार ऍट लॉ ही पदवी घेतली. पौर्वात्य आणि पश्चिमात्य साहित्याचा त्यांचा. गाढा व्यासंग होता. इंग्लंडमध्ये त्यांच्यावर समाजवादी विचारांचा मोठा पगडा पडला. तेथील मजूर पक्षाच्या उपक्रमात ते सहभागी होत असत. भारतात आचार्य नरेंद्र देव ,जयप्रकाश नारायण आणि डॉ. राम मनोहर लोहिया ही त्यांची प्रेरणास्थानी होती. असामान्य बुद्धिमत्ता आणि वक्तृत्वामुळे आंतरराष्ट्रीय समाजवादी युवा संघटनेचे अध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आले होते. १९५५ ते १९६० अशी सलग सहा वर्षे ते या संघटनेचे अध्यक्ष होते.
भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात, भूमिगत चळवळीचे ते सहभागी होते. त्यांनी अतोनात हालअपेष्ठा सोसल्या. आपल्याला केवळ इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला भारत नको आहे .तर गरिबीच्या ,दारिद्र्याच्या, अन्यायाच्या ,भुकेच्या ,शोषणाच्या मगरमिठीतून भारताला आपल्याला मुक्त करायचे आहे ही त्यांची भूमिका होती. नाथ पै यांनी समाजवाद आणि लोकशाहीबद्दल सातत्यपूर्ण आग्रही मांडणी केली. १५ ऑगस्ट १९४७ हा भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन नाथ पै यांनी आपल्या सेवादल सहकाऱ्यांसह बेळगाव मध्ये टिळक चौकात ध्वजवंदन करून साजरा केला होता.
संयुक्त महाराष्ट्राच्या व सीमा प्रश्नाच्या आंदोलनात ते सहभागी होते. त्यासाठी त्यांनी म्हैसूरच्या तुरुंगात तुरुंगवासही भोगला. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदार संघातून १९५७,६२ आणि ६७ अशा तीन वेळा ते संसदेत निवडून गेले. तत्पूर्वी १९५२ साली त्यांनी मुंबईमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.ते एक आदर्श संसदपटू होते .पंतप्रधान पंडित नेहरू सुद्धा त्यांची मांडणी ऐकण्यासाठी उत्सुक असत. नेहरू त्यांना एक सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणत असत.परराष्ट्र धोरणामध्ये त्यांना गोडी असल्याने व त्यांचा त्याविषयीचा व्यासंग असल्याने अनेकदा संसदीय शिष्टमंडळात परदेश दौऱ्यासाठी नेहरू त्यांचा समावेश करत. युनोच्या मानवाधिकार समितीचेही ते सदस्य होते.
नाथ पै हे अतिशय रसिक व विचारी व्यक्तिमत्त्व होते. साहित्य,कला याबद्दल त्यांना प्रेम होते. त्यांनी असे म्हटले आहे की,'कवी ,कलावंत आणि विचारवंत यांचा आदर कसा करावा हे ज्या समाजाला कळत नाही त्या समाजाचा नाश अटळ आहे.'तसेच कलाकारांबाबत ते म्हणतात ,'आपल्यासमोर उभी ठाकलेली आव्हाने डोळसपणे समजून घेऊन त्याचा मुकाबला करण्याची हिम्मत लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न लेखक कलाकारांनी केला पाहिजे. त्यांनी हे केले तरच लोकशाही यशस्वी होईल.देशाच्या अखंडतेला आणि ऐक्याला बाधा पोचणार नाही. कलाकाराच्या भूमिके बाबत ते म्हणतात ,'कलाकारांमध्ये भौगोलिक अंतर ,वंश ,वर्ण राष्ट्रीयत्व अथवा धर्म असे कितीही भेद असोत पण त्या सर्वांच्या स्फूर्तीचा मूलस्त्रोत एकच असतो आणि तो म्हणजे वंचित ,सर्वहारा मानवजाती विषयीची सहानुभूती.'आणखी एके ठिकाणी ते असं म्हणतात,' ज्या देशात निष्ठा ही विकत घ्यायची आणि विकायची गोष्ट बनते त्या देशाचे स्वातंत्र्यही खरेदी विक्रीची वस्तू बनू शकते. म्हणजेच ते धोक्यातही येऊ शकते.
'लोकशाहीची आराधना' या पुस्तकाला ज्येष्ठ विचारवंत नेते कालवश ना.ग .गोरे यांची प्रस्तावना आहे. बॅरिस्टर नाथ पै यांच्या वक्तृत्वाबद्दल ना.ग.गोरे म्हणतात ,नाथ पै यांच्या आवाजात एक कमावलेल मार्दव आहे .त्यांच्या वाणीला विलक्षण वेग होता, धार होती. मला अनेकदा वाटे की नाथ पै अव्वल दर्जाचे गायक बनले असते. इतके त्यांचे भाषण गायनाच्या ढंगा अंगाचे असे. खर्जापासून तार सप्तकापर्यंतचे आवाज त्यांच्या भाषणात येऊन जात. त्यामध्ये लय असे ,खटके असेत , पलटे असत .इतक्या सुरेल व हुकमी आवाजाचा वक्ता नामदार श्रीनिवास शास्त्री यांच्यानंतर मी ऐकला नाही. पण नाथ पै यांची मदार केवळ आवाजावर कधीच नसे.संसदेमध्ये बोलायचे असेल तर नाथ किती तयारी करीत हे मी पाहिलेले आहे. आपल्या अतिशय गचाळ अक्षरात त्यांनी केलेल्या भाराभर टिपण्या त्यांच्या फायलीच असत. ते संदर्भ पाहून ठेवीत .पुरावे गोळा करत पण एवढ्यावर थांबत नसत. एखादे संस्कृत वचन, एखादा चपखल विनोदी चुटका,एखादे जर्मन किंवा फ्रेंच वाक्य अशी सगळी आयुधे घेऊन ते सभागृहात येत. त्यांची स्मरणशक्ती प्रखर होती. ते नेहरूंना उद्रृत करू लागले तर नेहरुच बोलत आहेत असे वाटावे.आचार्य अत्र्यांचा किस्सा सांगू लागले तर आचार्यांचा आवाज ते ऐकवितआणि इंदिराबाईंना आपणच नाथ पै यांच्या जागेवरून बोलत नाही ना ? असे ते भासवू शकत.' ना. ग .गोरे यांनी केलेल्या या वर्णन वर्णनातच नाथ पै किती थोर होते हे कळून चुकते.
प्रचंड विद्वत्ता असलेले नाथ पै श्रोत्यांशी सोप्या भाषेत सहजपणे संवाद साधत .मृत्यूपूर्वी आठ महिने म्हणजे २ एप्रिल १९७० रोजी आपल्या मतदारसंघातील एका खेड्यात त्यांचे भाषण झाले. आज इंडिया की भारत या अत्यंत उथळ आणि सवंग चर्चेला लोकांच्या माथी मारले जात आहे. अशावेळी लोकशक्तीला ते कसे जागृत करत याचे ते भाषण म्हणजे उत्तम उदाहरणच आहे.त्यात ते म्हणाले ,हिंदुस्तान स्वतंत्र राहणार की नाही याचा निर्णय फक्त पार्लमेंट मध्ये होत नसतो. याचा निर्णय गावांमध्ये होत असतो .तुमच्या या झोपडपट्टीमध्ये होत असतो. तुमच्या या सभेमध्ये होत असतो. हिंदुस्थानचा खरा जन्म होत असतो तो तुमच्या मनामध्ये आणि हिंदुस्तानची खरी तलवार उभी राहत असते ती तुमच्या मनगटामध्ये. तुम्ही आणि आम्ही ही जाणीव ठेवली पाहिजे आणि वागले पाहिजे की, मी आज गरीब असेन, मी आज बेकार असेन ,आज मी उपाशी असेन ,परंतु हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेल्या या देशाचा मालक मी,धनी मी, स्वामी मी ,रक्षणकर्ता मी ,तारणहार मी ,या भूमीचा उद्धार मी करणार, तुमच्यातील न्यूनगंडाची भावना गेली पाहिजे. मान वाकणार नाही ,गुडघे टेकणार नाही, हे मनगट पिचणार नाही अशी भावना या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे. मग ना आम्हाला चीनची भीती ना आम्हाला पाकिस्तानची भीती.'
वयाच्या ३८ व्या वर्षी नाथ पै यांनी१९६० साली व्हिएन्ना येथील क्रिस्टल मुशेल यांच्याशी विवाह केला. क्रिस्टल यांचे वडील ऑस्ट्रियन सरकारमध्ये सचिव पदावर कार्यरत होते.या दाम्पत्याला आनंद,दिलीप ही दोन मुले झाली. नाथ पै यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी क्रिस्टल यांना घरामध्ये दहा हजार रुपये असलेले आणि त्यावर निवडणूक खर्चासाठी असे लिहिलेले पाकीट आढळले .त्यांनी ते पैसे नाथ यांच्या जागी पक्षाचे उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या प्रा. मधून दंडवते यांच्या स्वाधीन केले. नाथ पै यांच्या निधनानंतर क्रिस्टल या आपल्या दोन्ही मुलांना घेऊन ऑस्ट्रियाला गेल्या.तेथे त्यांनी नोकरी करून मुलांचे संगोपन व शिक्षण केले.२१ जून २०१८ रोजी क्रिस्टल यांचेही निधन झाले.कालवश पु.ल.देशपांडे यांनी त्यांना प्रकाशाचा पुत्र असे संबोधुन म्हटले होते की ,' आत्मसमर्पण ही सभोवतालचा अन्याय दूर व्हावा, समाजाचे जीवन अधिक विवेकी व्हावे, सर्वांच्या दुःखाची काळजी वाहणारे व्हावे म्हणून दिलेली शेवटची किंमत असते. चांगल्या मूल्यांच्या वेदीवर दिलेले ते बलिदान असते. नाथचे सारे आयुष्य असल्या बलिदानाच्या दिशेने झेपावणारे होते.'बॅरिस्टर नाथ पै यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन...!
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे गेले अडतीस वर्षे कार्यकर्ते आहेत. तसेच गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)