स्टालिन यांचा निर्णय अवयवदात्यांचे मोल जपणारा



प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

prasad.kulkarni65@gmail.com

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी २३ सप्टेंबर २०२३ रोजी एका कार्यक्रमात अतिशय महत्त्वपूर्ण घोषणा केली. ती म्हणजे 'जे लोक अवयव दान करतात ते अनेकांचा जीव वाचवतात .त्यामुळे ते एखाद्या हुतात्म्याहून कमी नाहीत .त्यामुळेच त्यांचे अंत्यसंस्कार हे शासकीय इतमामात केले जातील.'भारतामध्ये अवयव दानाची सुरुवात झाल्यापासून तामिळनाडू त्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे. तामिळनाडू मधील अवयव प्रत्यारोपण प्राधिकरणाचे सदस्य डॉ.एन. गोपाल कृष्णन यांनी असे सांगितले की येथील रुग्णालयामध्ये रुग्णालयातील डॉक्टर आणि पारिचारक तसेच अन्य कर्मचारी मृतांसाठी सन्मान फेरीचे आयोजन करतात. अवयवदान करणाऱ्यांकडे पाहण्याचा तामिळनाडू सरकारचा हा दृष्टिकोन अतिशय व्यापक आणि समाजभानी आहे. राज्यासाठी राष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण स्वरूपाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींवर शासकीय इतनामात अंत्यसंस्कार केले जातात.अशी आपल्याकडे परंपरा आहे . अवयवदान करणाऱ्या व्यक्ती या राष्ट्रासाठी अशाच महत्वपूर्ण मानण्यात येत असल्याचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी या निर्णयातून दाखवून दिले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही हा आदर्श घ्यावा असा आहे.

देहदान आणि अवयवदान यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे देहदान नैसर्गिक मृत्यूनंतर करता येते. तर अवयवदान दवाखान्यात अतिदक्षता विभागात मेंदू मृत झालेल्या (ब्रेन डेड )झालेल्या व्यक्तीची व्हेंटिलेटरच्या आधारे हृदयप्रक्रिया सुरू असेल त्याच वेळेस करता येते.ब्रेन डेड झालेली व्यक्ती काहीही झाले तरी पुन्हा जिवंत होऊ शकत नाही हे वैद्यकीय सत्य आहे. अशा ब्रेन डेड व्यक्तीच्या हृदय, दोन किडन्या, दोन फुफुसे ,आतडे ,लिव्हर आदी किमान आठ अवयवांचे दान करून आठ जणांना पुनर्जन्म मिळू शकतो. दरवर्षी १३ ऑगस्ट या दिवशी जागतिक अवयव दान दिन साजरा केला जात असतो.

भारतात दर दिवशी किमान अठरा रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाची गरज असते .एका व्यक्तीने अवयवदान केले तर सात-आठ लोकांना नवजीवन मिळू शकते. त्यांचा पुनर्जन्म होत असतो. अमेरिका ,ब्रिटन यासारख्या देशात ४० % हून अधिक जास्त कुटुंबे अवयवदानाला सहकार्य करतात .भारतात हे प्रमाण दोन टक्क्या पेक्षा कमी आहे. दर दहा लाखात जगातील अनेक देशात वीस ते पन्नास लोक अवयवदान करत असतात. पण आपल्याकडे हे प्रमाण ०.०८ इतके अत्यल्प आहे. तसेच दरवर्षी किमान ५० लाख व्यक्ती एखादा अवयव निकामी झाल्याने मृत होतात. त्यात दर दहा मिनिटाला एकाची भर पडत असते. भारतात मृत होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नेत्रदान केले गेले तर अवघ्या अठरा दिवसात देशातील सर्वजणांना दृष्टी प्राप्त होऊन आंधळेपणा नष्ट होईल. यावरूनच अवयव दानाच्या चळवळीचे अत्यंतिक महत्त्व अधोरेखित होते.

या निमित्ताने एका गोष्टीची आठवण होते.' द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन ' या संस्थेच्या वतीने नाशिक ते बेळगाव अशी ७८७ किलोमिटर अंतराची ४९ दिवसांची ' अवयव दान जनजागृती पदयात्रा' 2020 च्या प्रारंभी काढण्यात आलेली होती काढण्यात आली होती. सुनील देशपांडे ,पुरुषोत्तम पवार- पाटील ,सुधीर बागाईतकर ,नारायण म्हस्कर ,शैलेश देशपांडे आदी प्रमुखांसह ही यात्रा आयोजित केली होती.इचलकरंजीत ती पदयात्रा बुधवार दि. १२ फेब्रुवारी २०२० रोजी आली होती. तेव्हा समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने तिचे स्वागत करण्यात आले होते. तसेच प्रबोधिनी व श्रीमती आ. रा.पाटील कन्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान चवळीचे महत्त्व सांगणारा परिसंवादही ठेवला होता. या परिसंवादात अवयवदान जनजागृती पदयात्रेचे संकल्पक सुनील देशपांडे (नाशिक )यांनी अतिशय सविस्तर मांडणी केली होती. ते म्हणाले,' अवयवदान हा आजच्या काळातील विज्ञानाने सिद्ध केलेला महामृत्युंजय यज्ञ आहे. त्यात प्रत्येकाने आपल्या सहभाग संकल्पाची समिधा अर्पण करून अवयवदानाद्वारे मृत्यूनंतरही जीवन देणारा हा यज्ञ धगधगता ठेवला पाहिजे. माणूस मृत झाल्यावर त्याच्या अंगावरील दागिने आपण किमती व उपयोगी आहेत म्हणून काढून घेतो .पण अनेकांना जीवदान देऊ शकणारे अनमोल स्वरूपाचे अवयव जाळून किंवा पुरून टाकून मातीमोल करतो.माणुसकी हाच धर्म आणि रक्तगट हीच जात हा नव्या युगाचा महामंत्र आपण ध्यानात घेऊन अवयवदान चळवळ विकसित केली पाहिजे.'

'द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन' या संस्थेचे संस्थापक पुरुषोत्तम पवार-पाटील (वसई ) यांच्या मते, प्रत्येकाने निश्चय केला पाहिजे की, मी माझे अवयव वाया घालवणार नाही .अशी परिस्थिती यावी आणि प्रत्येकाने म्हणावे की हल्ली आमच्या समाजात कोणाचेही मरण झालं की अवयवदान करतातच. किंवा किमान नेत्रदान व त्वचादान तरी करतातच करतात .कारण आमच्यात तो रिवाजच आहे. खरंच असा आपला भारतीय समाजाचा रिवाज झाला तर केवढी मोठी दुःखमुक्ती होईल. त्यासाठी काही अंधश्रद्धा सोडाव्या लागतील .आणि निखळ वैज्ञानिक व मानवी दृष्टिकोन स्वीकारावा लागेल .त्याबाबत अथक प्रबोधन करावे लागेल.

अवयवदान व प्रत्यारोपण करताना कधीही प्रतीक्षा यादीत फेरफार केला जात नाही.त्यामुळे आपले दान प्रतीक्षेत असलेल्या नेमक्या गरजवंतालाच मिळत असते.भारतात एकोणतीस वर्षांपूर्वी म्हणजे १९९४ मध्ये अवयवदान कायदा करण्यात आला.अवयवदानावर सरकारचे नियंत्रण असावे,त्याचे व्यापारीकरण होऊ नये, नेमक्या गरजवंताला ते मिळावे हा त्या कायद्यामधील मुख्य उद्देश आहे. कालानुरूप योग्य ते बदलही केले गेले आहेत. कोणताही नवा विचार, बदल सहजपणे समाजात स्वीकारला जात नाही. त्याला विविध कारणांनी विरोध होतो. तो पचवावा लागतो. त्याचे महत्त्व व सत्यता पटवून द्यावी लागते. संयम ठेवावा लागतो. पुरुषोत्तम पवार-पाटील यांच्या मते ,'आजच्या डिजिटल युगातील सुज्ञ लोक आता भावना- गैरसमज बाजूला करून अवयवदाना बाबत वास्तव विचार करू लागले आहेत.सर्व धर्मीय धर्मगुरूही  अवयवदानाचा पुरस्कार करू लागले आहेत. आता धर्माचा अडसर राहिला नाही .फक्त आमची मानसिकता बदलायला हवी. समाजात बदल घडतो आहे .लोक स्वतःहून पुढे येऊ लागले आहेत. आपण सर्वांनीही अवयवदानाला भावनिक होकार न देता अभ्यासपूर्वक पावले उचलली पाहिजेत.महत्त्वाचे म्हणजे यात कुटुंबीयांच्या धाडसी निर्णयाला अधिक महत्त्व आहे .अवयव दान करणारे हे अवयव स्वीकारणाऱ्या व्यक्तीसाठी पूजनीय , महनीय तर आहेतच. मात्र त्याचबरोबर ते व संमती देणारी त्यांचे नातेवाईक हे देखील एक वेगळे आदर्शवादी दीपस्तंभ ठरतात.'हे सर्व लक्षात घेतल्यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा अवयवदान करणाऱ्यांचे अंत्य संस्कार शासकिय इतमामान करण्याचा निर्णय अतिशय अर्थपूर्ण आहे.


.(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीच्या वतीने गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच ज्येष्ठ वृत्तपत्र पत्रलेखक आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post