नागरिकांनी घाबरून न जाता घर व परिसरात डासांची उत्पती होणार नाही याची काळजी घ्यावी
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे
इचलकरंजी शहरात झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आल्याने संभाव्य संसर्ग रोखण्या साठी आणि आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे साठी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समवेत संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते.
सदर बैठकीत शहरातील तसेच शहर परिसरातील सद्यस्थितीचा आढावा घेतला.सदर रोगाबद्दल नागरिकांची जनजागृती व्हावी यासाठी होर्डिंग, हॅडबिल, घंटागाडी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न करणेचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.त्याचप्रमाणे शहरातील प्रत्येक झोन नुसार आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणेचा निर्णय घेण्यात आला.
झिका व्हायरसच्या सद्यस्थितीच्या अनुषंगाने शहरातील गरोदर स्त्रियांची तपासणी, आवश्यकते नुसार सोनोग्राफी करणेसाठी योग्य ती कार्यवाही करणेच्या सुचना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या स्त्री रोग तज्ञ डॉ.श्रीमती रुईकर यांनी केल्या. तसेच संपूर्ण शहरात फॉगिंग करणेच्या सुचना महानगरपालिका मलेरिया विभागास देऊन आवश्यक वाटल्यास तालुका आरोग्य अधिकारी यांचेकडून फॉगिंग मशीन उपलब्ध करून घेण्याचे आदेश आयुक्त यांनी दिले.
शहरात उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी तसेच त्याचा प्रसार रोखण्यासाठी महानगर पालिका प्रशासन, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी एकत्रितपणे काम करुया आणि झिका व्हायरस हा डास चावल्यानंतर शरीरात प्रवेश करतो. या डासाची पैदास स्वच्छ पाण्यामध्ये होत असते. ताप येणे, शरीरावर ओरखडे उठणे, सांधेदुखी,अंगदुखी, तसेच डोळे चरचरणे आदी लक्षणे संशयितामध्ये दिसतात. योग्य उपचार केल्यास हा आजार सात दिवसात बरा होतो त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता घर व परिसरात साचणाऱ्या स्वच्छ पाण्याची योग्य विल्हेवाट लावून डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी केले.
या बैठकीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजेश गायकवाड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ सुनिलदत्त संगेवार,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षला वेदक,वैद्यकीय अधीक्षक डॉ.एस.बी. देशमुख, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद मोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संजय रणवीर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पी. एस.दातार, डॉ.अमित सोहणी, एन.यु.एच.एम.कडील सर्व वैद्यकीय अधिकारी यांचेसह महानगरपालिका आरोग्य विभाग आणि जिल्हा हिवताप विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.