समाजवादी प्रबोधिनीच्या चर्चासत्रातील मत
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक शिक्षण आयोग नेमले गेले. धोरणे आखली गेली.पण त्यासाठीच्या तरतूदी अभावी आजतागायत या व्यवस्थेचा खेळखंडोबा झालेला आहे. नव्या शैक्षणिक धोरणाने हा खेळ अधिक प्रमाणात चालवलेला आहे. प्रत्येक शिक्षकाने आणि शिक्षणक्षेत्राशी संबंधित प्रत्येक घटकांनी हे नवे शैक्षणिक धोरण तपशिलात समजून घेण्याची नितांत गरज आहे.कारण त्याखेरीज भारतीय शिक्षण व्यवस्था कोणत्या दिशेने नेण्याचा प्रयत्न होतो आहे आणि तिची दशा काय होण्याची शक्यता आहे हे कळू शकणार नाही. लोकप्रबोधन आणि लोकशिक्षणासाठी अवघे आयुष्य खर्च करणाऱ्या शांतारामबापूंचा स्मृतीदिन आणि शिक्षकदिनाच्या निमित्ताने प्रत्येक सजग घटकाचे ते कर्तव्य आहे. कारण प्रबोधनाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे,असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिकं चर्चासत्रात ' शैक्षणिक धोरण आणि वास्तव ' या विषयावर व्यक्त करण्यात आले.
समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस, थोर विचारवंत , स्वातंत्र्यसैनिक आणि लोकशिक्षक शांताराम बापू गरुड यांचा बारावा स्मृतीदिन आणि शिक्षक दिनानिमित्त हे चर्चासत्र आयोजित केले होते.
या चर्चासत्रात प्रसाद कुलकर्णी यांनी मुख्य मांडणी केली.तर सचिन पाटोळे यांनी समारोप केला. चर्चासत्रात तुकाराम अपराध, पांडूरंग पिसे, डी.एस.डोणे, अशोक केसरकर, देवदत्त कुंभार, अशोक मगदूम आदींनी शैक्षणीक क्षेत्राच्या विविध अंगांवर विचार व्यक्त केले. प्रारंभी कालवश शांताराम बापू गरुड यांच्या बाराव्या स्मृतीदिनी त्यांच्या प्रतिमेला अशोक केसरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शांताराम बापूंच्या विचार कार्याला उजाळा देत ते विचारकार्य अधिक नेटाने करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे मत व्यक्त करण्यात आले. तसेच जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीमाराचा तीव्र निषेध करण्यात आला व यातील दोषींवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
शैक्षणिक धोरण आणि वास्तव याची चर्चा करताना या चर्चासत्रात असे मत व्यक्त झाले की,भारतातील परंपरा आणि मूल्यव्यवस्था यांच्याशी सुसंगत असणारे आणि एकविसाव्या शतकातील महत्त्वाकांक्षी उद्देशांच्या पूर्ततेसाठी आवश्यक अशी रणनीती आखणारे हे धोरण आहे असे म्हटले आहे.
पण मुद्दा असा आहे की, भारताच्या नेमक्या कोणत्या परंपरा आणि कोणती मूल्यव्यवस्था सत्ताधारी वर्ग या धोरणातून पुढे आणू इच्छितो ? विषमतावादी धोरणे आणि चातुर्वर्ण्य व्यवस्था नव्या पद्धतीने विकसित करण्याचा हेतू तर नाही ना ?अशी शंका नव्हे तर खात्री पटावी अशा पद्धतीने या धोरणाच्या समर्थना बाबतची मांडणी होऊ लागली आहे. प्युअर सायन्स अर्थात शुद्ध विज्ञानावर आधारित,वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित वाटचाल करणे गरजेचे आहे. चुकीच्या कालबाह्य परंपरा, मानव निर्मित विषमतेची तरफदारी करणारी मूल्यव्यवस्था अत्यंत निंदनीय आहे. याचा निषेध करून सर्वांगीण समताधारीत समाजव्यवस्था प्रस्थापित करणारी शिक्षण व्यवस्था असणे ही काळाची गरज आहे.कारण भारतीय संविधानाने दिलेली मूल्यव्यवस्थाच सर्वश्रेष्ठ आहे आणि तीच स्वीकारली गेली पाहिजे. तसेच शिक्षकांना शिक्षक म्हणून असलेली कामे करण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे. त्याच्यावरील अन्य कामांचे ओझे कमी केले पाहिजे. या चर्चासत्रात शैक्षणिक धोरण आणि शैक्षणिक वास्तव याची विविध अंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.