कर्जत महाराष्ट्रातील गांजा तस्करीचे केंद्र.
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
विशाखापट्टनम व्हाया पुणे अन् कर्जतकडे निघालेला तब्बल सव्वा पाचशे किलो गांजा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुणे- नगर रस्त्यावर पकडला. प्रथमच एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात पुण्यातून वाहतूक होणारा गांजा पकडण्यात आला असून, हा गांजा कर्जतमधून महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यासह गुजरात राज्यात पाठविला जात असल्याची माहितीही समोर आली आहे.
विशाखापट्टनम व्हाया पुणे अन् कर्जतकडे निघालेला तब्बल सव्वा पाचशे किलो गांजा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुणे- नगर रस्त्यावर पकडला. प्रथमच एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात पुण्यातून वाहतूक होणारा गांजा पकडण्यात आला असून, हा गांजा कर्जतमधून महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यासह गुजरात राज्यात पाठविला जात असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे कर्जत गांजाची तस्करीचे प्रमुख केंद्र असल्याचेही उघडकीस आले आहे. 2 कारच्या माध्यमातून या गांजाची वाहतूक केल्याची माहिती समोर आली आहे.
संदीप बालाजी सोनटक्के (29, रा. रायगड), निर्मला कोटेश्वरीमुर्ती जून्नरी (36, रा. गट्टुर, आंध्रप्रदेश), महेश तुळशीराम परीट (29, रा. रायगड) असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीष गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे वरिष्ठ निरीक्षक सुनिल थोपटे, उपनिरीक्षक शुभांगी नरके, अंमलदार योगेश मांढरे, शिवाजी घुले, संतोष देशपांडे, युवराज कांबळे, प्रशांत बोमदंडी, संदीप जाधव यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.
पुण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा पुरवठा होत असल्याचे वास्तव पुणे पोलिसांनी कारवाईतून समोर आणले आहे. यासोबतच पुण्यातून या ड्रग्सची देखील वाहतूक होत असल्याचे दिसत आहे. त्यापार्श्वभूमीवरच पुणे पोलिसांकडून तस्करांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यादरम्यान, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून हद्दीत गस्त वाढविण्यात आली आहे. त्यानूसार पथक गस्तीवर असताना आंध्रप्रदेशातून नगर रस्त्यावर कारमधून गांजा वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानूसार पथकाने सापळा रचून नगर रस्त्यावर स्कॉर्पिओ व सेलेरिओ या दोन संशयीत गाड्या थांबविल्या.
वाहनांची तपासणी केली असता त्यात गांजा भरलेल्या बॅगा आढळून आल्या. पोलिसांनी एका महिलेसह तिघांना ताब्यात घेतले. आरोपींच्या कारमध्ये 1 कोटी 4 लाखांचा तब्बल 520 किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा, स्कॉर्पिओ, सेलेरिओ गाडी आणि मोबाईल असा तब्बल 1 कोटी 19 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी आंध्रप्रदेशातून गांजा विकण्यासाठी आणला होता.
महिलाला बसवून आणले.
पुण्यात तसेच वाहतूकीदरम्यान पोलिसांनी गाडी अडवू नये, यासाठी आरोपींनी स्कॉर्पिओ व सेलेरिओ या गाड्यांसोबतच या महिलेला कारमध्ये बसविलेले होते. यापुर्वीही तीन वेळा त्यांनी अशा प्रकारे गांजा आणला असल्याचे तपासात समोर आले आहे.
कर्जत महाराष्ट्रातील गांजा तस्करीचे केंद्र..!
पुण्यासह पुर्ण महाराष्ट्रातील गांजा पुरवठाचे गांजा तस्करीचे केंद्र कर्जत असल्याचे समोर येत आहे. तिघांकडून हा गांजा कर्जत शहरात नेण्यात येत होता. तेथून तो महाराष्ट्र आणि गुजरात येथे देखील पुरवला जातो. या तिघांनी यापुर्वीही दोन ते तीन वेळा गांजा विशाखापट्टनम येथून आणल्याचे तसेच या महिलेला देखील यापुर्वीही गाडी पकडू नये यासाठी नेले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गांजा तस्करीचे केंद्र कर्जत असल्याचे दिसत आहे.
गाडीवर महाराष्ट्र शासनाचा बोर्ड
पोलिसांना संशय येवू नये, यासाठी गाडीला महाराष्ट्र शासन नावाचा बोर्ड लावला होता. पण, गुन्हे शाखेला पक्की खबर होती. त्यामुळे या गाड्या पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.