उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांना शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचा 'लाईफ टाईम अचिव्हमेंट' पुरस्कार जाहीर



प्रेस मीडिया लाईव्ह :

शिरोळ : दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यावतीने देण्यात येणारा लाईफ टाईम अचिव्हमेंट ॲवॉर्ड श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांना जाहीर करण्यात आलेला असून सदर पुरस्काराचे वितरण दिनांक ६ सप्टेंबर, २०२३ रोजी तिरुवअनंतपुरम (केरळ) येथे करण्यात येणार आहे. दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया च्या ८१ व्या वार्षिक परिषदेमध्ये हा पुरस्कार देण्यात येईल. साखर उद्योग आणि सलग्न संस्था यांच्या भरभराटीसाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसीत करणे, उत्पादन क्षमता वाढविणे, दर्जेदार उत्पादन घेणे आणि साखर उद्योगाला प्रोत्साहन देणे याकरीता ही संस्था १९२५ पासून कार्यरत आहे. भारत सरकारने या संस्थेस सांयटीफीक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणून मान्यता दिलेली आहे.

साखर उद्योगातील उत्कृष्ट योगदानाबद्दल व केलेल्या कार्याची दखल घेऊन दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने सदरचा पुरस्कार यावर्षी गणपतराव पाटील यांना देण्याचा निर्णय घेतला आहे आणि तसे संस्थेचे अध्यक्ष संजय अवस्थी यांनी कळविले आहे.

शिरोळ तालुक्यातील क्षारपडमुक्तीचे जनक गणपतराव पाटील यांनी केलेल्या नेत्रदिपक कार्याची दखल घेऊन गतवर्षी न्यूज १८ लोकमत तर्फे उत्कृष्ठ सहकाररत्न हा पुरस्काराने देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच नुकताच गडहिंग्लज येथील विद्या प्रसारक मंडळ व डॉ. घाळी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा डॉ. घाळी समाजभूषण पुरस्कार गणपतराव पाटील यांना जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण २४ ऑगस्ट, २०२३ इ. रोजी आमदार स्व. एस. एस. घाळी यांच्या स्मृतीदिनी निडसोशी मठाचे मठाधिपती श्री शिवलिंगेश्वर महास्वामी यांच्या शुभहस्ते गडहिंग्लज येथे होणार आहे. तसेच दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या नुकत्याच जाहीर झालेल्या लाईफ टाईम अचिव्हमेंट अॅवॉर्ड या पुरस्कारामुळे श्री दत्त उद्योग समुहामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.

Post a Comment

Previous Post Next Post