शेती व्यवसायात प्रगती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व सेंद्रिय शेती करणे गरजेचे : ए. डी. कडलक



प्रेस मीडिया लाईव्ह :

शिरोळ/ प्रतिनिधी:

आजच्या जगात शेती व्यवसाय महत्वाचा आहे. पण शेतीत दिवसरात्र राबूनसुद्धा शेती करणे परवडेनासे झाले आहे. तेव्हा शेती व्यवसायात प्रगती करून विकास साधायचा झाल्यास आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे त्याचबरोबर सेंद्रिय शेती करणे गरजेचे आहे, असे मत वसंतदादा शुगर पुणेचे प्रमुख शास्त्रज्ञ ए. डी. कडलक यांनी कारदगा येथे बोलताना व्यक्त केले.

      श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ व महाधन एग्रोटेक लि. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कारदगा येथील महादेव मंदिरात ऊस पीक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या ऊस पीक परिसंवादात मार्गदर्शन करताना ए. डी. कडलक बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी लक्ष्मण पसारे होते. 

    पुढे बोलताना ते म्हणाले, शेतीविषयी जगात ज्ञान नाही ते आपल्या देशात आहे. तेव्हा शेतीचे तंत्रज्ञान समजून घेऊन शेती केली पाहिजे. आज ऊस पीक हे आर्थिक पीक आहे. त्याचबरोबर इतर पिके घेण्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. जमिनीची सुपीकता वाढवून उत्पादनात वाढ करायची झाल्यास माती परीक्षण, पाण्याचे योग्य नियोजन, खतांचे नियोजन करणे महत्वाचे आहे. आज सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. त्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करून तसेच शेतीतील तन, पाचट शेतातच कुजवले पाहिजे व सेंद्रिय कर्ब वाढवला पाहिजे.आज  विविध खतांच्यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट झाली असा आमचा समज आहे तो चुकीचा आहे. जमिनीची सुपीकता नष्ट होण्यासाठी पाण्याचा अतिवापर हे एकमेव कारण आहे. त्यासाठी पिकांना पाणी नियोजन करून द्यायला हवे. तसेच रासायनिक, सेंद्रिय व जैविक खते व्यवस्थित देणे गरजेचे आहे.

       यावेळी दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील म्हणाले, आज शेती करण्यासाठी आपण योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. कमी खर्चात जादा उत्पादन कसे घेता येईल यासाठी अभ्यास करून शेतीसाठी लागणारे तंत्रज्ञान समजून घेऊन आपला आर्थिक विकास साधला पाहिजे. तुम्हा सर्व शेतकऱ्यांना दत्त कारखाना सदैव मदत करण्यास कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

      यावेळी चितळे डेअरीचे जनसंपर्क अधिकारी डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी म्हणाले, आज शेती व्यवसाय मुख्य आहे. पण शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. दुग्ध व्यवसाय आपल्या संसाराला खरा आधार आहे. पण हा व्यवसाय करताना आपण योग्य नियोजन करत नसल्याने आपण अडचणीत येत आहोत. आपण चांगली शेती करण्यासाठी जसे लक्ष देतो तसेच आपण आपण पाळलेली जनावरे उत्तम प्रकारे सांभाळली पाहिजेत. त्यांचे आरोग्य, चारा, पाणी नियोजन योग्य प्रकारे केल्यास आपल्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. तसेच जनावरांची काळजी कशी घ्यावी याबद्दल त्यांनी चित्रफितीद्वारे प्रत्यक्ष माहिती दाखविली. यावेळी महाधन कंपनीचे योगेश म्हसे यांनी महाधनच्या खताबद्दल माहिती दिली.

        प्रारंभी स्व. आमदार सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन गणपतराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्वागत बाळासाहेब नाडगे यांनी तर प्रास्ताविक मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगान्ना यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रकाश काशीद यांनी केले.

  यावेळी व्हा.चेअरमन अरुण देसाई, संचालक इंद्रजित पाटील, शरदचंद्र पाठक, महेंद्र बागे यांच्यासह कारदगा, भोज, बेडकिहाळ, ढोणेवाडी, कुन्नुर येथील शेतकरी, दत्त कारखान्याचे अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post