'झपुर्झा पुणे ' येथे ओजस संस्थेद्वारे प्रभावी सादरीकरण
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : ओजस संस्थेद्वारे सादर करण्यात आलेल्या तीन युवा शास्त्रीय नृत्य कलावंतांच्या 'अर्पण' नृत्य प्रस्तुतीला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.'झपुर्झा पुणे 'येथे ३० जुलै रोजी हे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. तीन शास्त्रीय नृत्य कलावंतांनी त्यांच्या नृत्य प्रस्तुतींद्वारे नटराज चरणी 'अर्पण' हा कार्यक्रम सादर केला.
कार्यक्रमात गौरेश शेटकर, सायली देवधर व ओजस संस्थेचा संस्थापक अथर्व चौधरी यांनी नृत्य प्रस्तुती सादर केली. सर्व सादरीकरणाला चांगली दाद मिळाली. गौरेश याने 'कथा कहे सो कथक' या प्रस्तुती द्वारे कथक चा मार्गक्रम विविध कथांद्वारे प्रेक्षकांना उलगडून दाखवला. एक सात्विक शिवस्तुती, जोशपूर्ण ताल शिखर व द्रौपदी वस्त्रहरण या अभिनय रचनेतून त्याने ह्या प्रस्तुतीस न्याय दिला. अमर्याद पुरुषोत्तम श्रीकृष्णांच्या लीला दर्शवणारी 'कृष्णमय' ही प्रस्तुती सायली देवधर हिने सादर केली. गोवर्धन गिरधारी हे किर्तन, भरतनाट्यम चा विभाग म्हणवले जाणारे भरतनृत्यम व एका तिल्लानातून तिने कृष्णाच्या लीला प्रस्तुत केल्या. अथर्व चौधरी याने त्याच्या 'नायकाभिनय' ह्या प्रस्तुतीतून प्रेम, वात्सल्य व भक्ती या मार्गातून होणारा एका नायकाचा प्रवास सादर केला. मरुलू कोंनाने ही जावळी, डूरूमाडू हे वात्सल्य पद व एका वेगळ्या धाटणीच्या भक्तीपदाने त्याने प्रस्तुतीची सांगता केली. कार्यक्रमांत तीनही नर्तकांनी 'समयासी सादर व्हावे' या अभंगावर नृत्य प्रस्तुती सादर करून प्रेक्षकांच्या टाळ्यांची दाद मिळवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अश्विनी चौधरी यांनी केले.' वैविध्यपूर्ण व युवा कलाकारांना मंच मिळवून देण्याचे काम सतत करत राहू', असे आश्वासन 'ओजस' चा संस्थापक अथर्व चौधरी याने दिले. पुण्याचा रसिकप्रिय प्रस्थापित झालेल्या पु.ना. गाडगीळ यांच्या 'झपुर्झा' मंचावर उत्तरोत्तर हा कार्यक्रम रंगत गेला.