पिंपरी चिंचवड करांचा वाहतूक कोंडीच्या समस्येतून कधी सुटका होणार ?
प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख :
पिंपरी चिंचवड शहर ;सध्या शहराची अवस्था पाहिल्यास केवळ कॉलनीतील अंतर्गत रस्ते वगळ्यास प्रत्येक रस्त्यावर वाहनांची बजबजपुरी झाली आहे. प्रत्येक ठिकाणी वाहनांचे पार्किंग होत असल्याने रस्त्यांची रुंदी कमी होत आहे. त्यामुळे रस्त्यांवरुन जाताना कधी खासगी बसेस, कधी अवजड वाहने तर कधी एसटी अनेकदा खोळंबून सारी वाहतूक ठप्प करतात.
शहरात सकाळी व सायंकाळी वाहनधारकांच्या प्रचंड संख्येमुळे रस्ते फुललेलेच असतात. अवजड वाहनांना काही रस्त्यांवर परवानगी दिलेली असल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा ठरत आहे.
महापालिकेकडूनही पार्किंगबाबत काटेकोरपणा राबवला जात नसल्याने वाहनांचे पार्किंग रस्त्यावरच केले जाते. त्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून कारवाई केली जाते. पण त्यालाही मर्यादा येतात. शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून चौका-चौकात कारवाई होत असली तरी अनेक ठिकाणचे वन वे, नो पार्किंगच्या ठिकाणी पार्किंग, रस्त्याच्या कडेला विक्री करणाऱ्यांची वाढती संख्या , रस्त्यालगत असलेल्या पतारी, हात गाडी वर किंवा तीन,चार चाकी वाहनांवर व्यवसाय करणाऱ्यांची अरेरावी,पायदळ रस्त्यांवर अतिक्रमणं याबाबत फारशी कारवाई होत नाही. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत अडकलेल्या शहरवासियांसाठी रस्ते सुरक्षेचे नियोजन कायमपणे राबवण्याची आवश्यकता आहे.
शहरात सध्या वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे ठिकठिकाणी दिसून येते. जिथे पार्किंग नाही, तिथे वाहन उभे केले जाते. एकेरी मार्ग असलेल्या रस्त्यावर दुहेरी वाहतूक सुरु असते. सिग्नल मोडून जाणारे, ट्रिपल सीट, मोबाइलवर बोलत दुचाकी चालवणारे अशा अनेक नियमांचे वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांसमोर सुरु असते. यातून अनेक तरुणांमध्ये वाहतूक विषयक नियमांची अंमलबजावणी करण्याची मानसिकता-च दिसून येत नाही. त्यासाठी सुरक्षा निमित्ताने काही नियोजन करण्याची आवश्यकता आहे.
खड्डेमय रस्ते, पार्किंगचा बट्याबोळ, अवजड वाहनांची घुसखोरी आणि वाढत चाललेल्या वाहनांचा सर्वच रस्त्यांवरील अनिर्बंध वावर यामुळे शहरातील वाहतूक कोंडी एखाद्या चक्रव्यूहसारखी झाली आहे. मुंबईतील चाकरमान्याची जशी दररोजची गाठ लोकलशी पडते. तसेच पिंपरी चिंचवडकरांना या वाहतुकीच्या चक्रव्युहाला भेदूनच दररोजची कामे करावी लागत आहेत. मध्यवस्तीतील रस्त्यांवर तर पदोपदी असुरक्षितता वाढत चालली आहे. पादचाऱ्यांना तर जीव मुठीत घेऊनच वावरावे लागत असून वाहतूक नियमांचा होत असलेला भंग वाहनधारकांनाही धोकादायक ठरत आहे. पिंपरी चिंचवड करांचा वाहतूक कोंडीच्या समस्येतून कधी सुटका होणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.