प्रेस मीडिया लाईव्ह :
डॉ.शिवाजी शिंदे : परभणी.
सेलू : एखाद्या माणसाचे काम होणार असेल तर त्यात वेळ वाया घालू नका, पण काम होत नसेल तर ते काम का? होत नाही हे नीट समजावून सांगा. या बाबत त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा, सर्वसामान्य नागरिकांना हेलपाटे व्हायला नको असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालय सेलू च्या वतीने येथील साई नाट्य मंदिरात महसूल दिना निमित्य मंगळवारी दि १ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी गावंडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाळे, स्वाती दाभाडे, निवृत्ती गायकवाड, जिवराज डापकर, शैलेश लाहोटी, तहसीलदार अमित घाडगे, दिनेश झांपले, राजेश सरवदे,माधव बोथीकर, प्रदीप शेलार, कैलासचंद्र वाघमारे,सौदागर कांबळे,पल्लवी टेमकर,सुनील कावरखे महसूल संघटनेचे नानासाहेब भेंडेकर, तलाठी संघटनेचे अध्यक्ष मुकुंद आष्टीकर आदीसह मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी गावंडे म्हणाले की, विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिंकापर्यन्त विना विलंब पोहोचावा. महसूल प्रशासनाप्रति नागरिकांमध्ये विश्वास वृद्धिगंत होईल, अशा पद्धतीने नागरिकांशी समन्वय व सुसंवाद साधावा काम होतच नसेल तर योग्य मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांच्या रस्त्यांच्या अडचणी तातडीने सोडाव्यात, मुख्यालय राहून दुष्काळ, अतिवृष्टी,निवडणूक शेती व शेतकरी आदी संबंधितांच्या आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे व पारदर्शकतेने दूर कराव्यात. गेल्या वर्षभरात चांगले काम झाले आहे. पण दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. उशिरा येणाऱ्या अधिकारी कर्मचार्यावर कारवाई केली जाईल. अशी स्पष्ट ताकीद जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी दिली.
डॉ.प्रताप काळे म्हणाले, येणाऱ्या काळात आव्हानांना सामोरे जाण्यासाठी साचोटी, प्रामाणिकपणा, कार्य तत्परता, तंत्रज्ञानकुशलता, शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षमता यासह जनसामान्यांच्या मनातील महसूल प्रशासनाची भीमा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. येत्या पाच वर्षात शेती आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल? यासाठी जबाबदारीने काम करावे लागेल.
कार्यकर्माच्या प्रारंभी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. कर्तव्यावर मृत्यू पावलेले तलाठी सुभाष होळ, सतीश जोंधळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या वारसांना प्रशासनाकडून सात लाख रुपये मदतीचा धनादेश देण्यात आला. या वर्षभरात परभणी जिल्ह्यात राबवलेल्या विविध उपक्रमांची चित्रफितीद्वारे माहिती देण्यात आली. यावेळी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विविध संवर्गातील अधिकारी, कर्मचारी तसेच विविध परीक्षेतील गुणवंत पाल्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान वाटप, प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
आशिष राठोड व संचाने स्वागत गीत गायले. सदानंद डाखोरे गिरिश दीक्षित यांनी साथ संगत दिली. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाळे यांनी केले. सूत्रसंचालन नायब तहसीलदार लक्ष्मीकांत खळीकर, मोहन बोराडे यांनी केले.तहसीलदार दिनेश झांपले यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला तहसिलदार टेमकर, सुनील कावरखे आदीसह तलाठी, महसूल कोतवाल, पोलीस पाटील, विविध संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
यानिमित्ताने सेलू शहरात महसूल दिंडी व महसूल ग्रंथांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. अधिकारी कर्मचारी रंगबिरंगी फेटे बांधून दिंडीत सहभागी झाले होते.
साईबाबा मंदिरात माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी जिल्हाधिकाऱ्यासह मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी उद्योजक जयप्रकाशजी बिहानी, रामेश्वर राठी आदींची उपस्थिती होती. श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या मुलींचे टाळपथक, पांडुरंग पाटणकर यांची बीएलओ वेशभूषा आणि विविध शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या पथ नाट्याने सर्वांचेच लक्ष वेधले.