मनपा आणि डिपीडीसीतील ढवळा-ढवळीतूनच वाद सुरू.
प्रेस मीडिया लाईव्ह :
शिवाजी शिंदे : जिल्हा प्रतिनिधी : परभणी.
परभणी : दि.28 परस्परांच्या कार्यक्षेत्रातील हस्तक्षेप अन् डिपीडीसीचे निधी वितरण हेच शिवसेनेचे खासदार संजय जाधव व राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यातील कलगीतुर्यासह संघर्षास कारणीभूत ठरले आहे.
खासदार जाधव व आमदार गुट्टे या दोघात अलिकडे पर्यंत राजकीयदृष्ट्या फारसे सख्य किंवा शत्रूत्व सुध्दा कधीही जाणवले नाही. कारण या दोघांनीही एकमेकांच्या कार्यक्षेत्रात कधीही ढवळा ढवळ किंवा मोठ्या गांभीर्याने टिका-टिप्पणी केली नाही. परंतु, गेल्या काही दिवसांपूर्वी या दोघात शीतयुध्द सुरु झाले. ते शीतयुध्द आता चांगलेच पेटले. ते एवढे की, दोघांनीही एकमेकांविरोधात आव्हाने देवून दंड थोपाटले आहे. त्यामुळे या दोघा लोक प्रतिनिधींच्या समर्थकांसह राजकीय क्षेत्राच्यासुध्दा भुवया उंचावल्या आहेत.या दोघातील या संघर्षाला अलीकडील काही घडामोडीच कारणीभूत असल्याचा राजकीय वर्तूळातून तर्क व अंदाज वर्तविला जात आहे. विशेषतः जिल्हा नियोजन समितीच्या (डिपीडीसी) निधी वाटपाचा एकतर्फी खेळ प्रामुख्याने चर्चेत आला आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी डीपीडीसीच्या निधी वितरणात सत्तारुढ पक्षाचे आमदार डॉ. गुट्टे व भारतीय जनता पक्षाच्या आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर या दोघांनाच पध्दतशीरपणे झुकते माप दिले. या दोघांच्याच कामांच्या शिफारशींना मंजूरी बहाल करीत कोट्यवधी रुपयांचा निधी बहाल केला. हे करतेवेळी विरोधी पक्षाच्या लोक प्रतिनिधींना त्या तूलनेत शिफारशी प्रमाणे फारशी तरतूद, निधी उपलब्ध केला नाही, असा सूर व्यक्त होत आला आहे. या बाबत पालकमंत्री डॉ. सावंत यांनी ओळीने सुध्दा खूलासा केला नाही. तर काही लोकप्रतिनिधींनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली खरी, परंतु त्या गोष्टीची सुध्दा दखल घेतली नाही. त्यामुळेच विरोधी पक्षाच्या लोक प्रतिनिधीं मध्ये अस्वस्थता आहे. त्यावर सत्तारुढ पक्षाचे लोकप्रतिनिधी उत्तर देतेवेळी याच पध्दतीने गेल्या सरकारच्या काळात याच लोकप्रतिनिधींनी निधी वाटपात आमच्यावर याच पध्दतीने अन्याय केला होता, या गोष्टी निदर्शनास आणून देत आहेत.
डिपीडीसी व्यतिरिक्त एकमेकांच्या कार्यक्षेत्रातील हस्तक्षेप हा सुध्दा जाधव विरुध्द गुट्टे संघर्षास कारणी भूत ठरत आहे. वास्तविकतः जाधव व गुट्टे या दोघा लोक प्रतिनिधींमध्ये यापूर्वी पर्यंत राजकीयदृष्ट्या फारसे सख्य किंवा फारसे शत्रूत्वसुध्द आढळले नाही. परंतु अलिकडे जाधव हे गंगाखेडच्या गुट्टेंच्या कार्यक्षेत्रात हेतुतः दौरे करीत, टिका-टिप्पणी करीत असल्याचा सूर गुट्टे समर्थक व्यक्त करीत आहेत. तर परभणी महानगर पालिकेच्या संभाव्य निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. गुट्टे यांनी तीसर्या आघाडीच्या नावा- खाली सातत्याने दौरे, काही माजी लोक प्रतिनिधींना हाताशी घेवून बांधणी करीत शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींवर निष्क्रियतेचा आरोप लावून टिका-टिप्पणी सुरु केली, असा सूर खासदार समर्थक व्यक्त करीत आहेत.एकंदरीत डीपीडीसीचा निधी असो, एकमेकांच्या कार्यक्षेत्रातील ढवळा ढवळ अन् हस्तक्षेपच या दोघा लोक प्रतिनिधींच्या संघर्षास कारणीभूत असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे.आमदार गुट्टे यांनी आठ दिवसांपूर्वीच परभणीत पत्रकार परिषद घेवून महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांसह मूलभूत सोयी सुविधांच्या प्रश्नावर टिका टिप्पणी करतेवेळी शिवसेनेच्या खासदार-आमदारांनी काय दिवे लावले, असा सवाल केला होता. त्यामुळे खासदार जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील यांनी जनआक्रोश मोर्चाच्या समारोपीय जाहीर सभेतून डॉ. गुट्टे यांच्यावर जोरदार हल्ला चढवून शिवसेनेने शहरासह जिल्ह्यासाठी केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला. तर खासदार जाधव यांनी गुट्टेंना प्रत्यूत्तर देतेवेळी तुमच्या कार्यक्षेत्रात येवून तुमच्या विरोधात तुम्ही शेतकर्यांवर केलेल्या अन्यायाबद्दल त्या शेतकर्यांचा मोर्चा काढू, असा इशारा दिला. त्यामुळेच आता जाधव विरुध्द गुट्टे संघर्षास नव्याने वेगळेच वळण लागले आहे. दोघेही एकमेकांवर टिका टिप्पणी करतेवेळी अगदी आक्रमक झाले आहेत. त्यातून एकमेकांविरुध्द कठोर शब्द वापरून आव्हान दिले जात आहे.