प्रेस मीडिया लाईव्ह :
शिवाजी शिंदे : जिल्हा प्रतिनिधी परभणी.
परभणी : सेलू तालुक्यातील सेलू ते निपाणी टाकळी या रस्ते कामात संबंधित कंत्राटदाराने गुणवत्तेबाबत अक्षरशः हलगर्जीपणा करीत निकृष्ट दर्जाचे मोठ्या प्रमाणावर काम केले असून त्यामुळे तो रस्ता आजही वाहतूकीस योग्य झाला नाही, अशी खंत सेलू तालुका दबाव गटाने जिल्हाधिकार्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
सेलू ते निपाणी टाकळी या रस्त्याच्या कामाकरीता राज्य सरकारने 49 लाख मंजूर केले. त्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभाग, जिंतूर उपविभागा- मार्फत काम सुरु करण्यात आले. या कामास जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे 24 ऑक्टोंबर 2021 रोजी प्रशासकीय मान्यता आहे. परंतु, संबंधित कंत्राटदाराने या रस्त्याचे काम अक्षरशः थातूर-मातूर पध्दतीने करीत बिले उकळली आहेत. त्यामुळे रस्ता आजही जैसे थे अवस्थेत आला असून या रस्ते कामात कोणतीही गुणवत्ता राखली गेली नाही, त्यामुळे या मार्गावरील ग्रामस्थांच्या व्यथा आजही कायम आहेत.
या प्रकरणात संबंधित ठेकेदाराविरोधात चौकशी करीत कठोर कारवाई करावी, ठेकेदारास मंजूरी नुसार पुन्हा काम करण्यास सांगावे, अशी मागणी अॅड. श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, इसाक पटेल, नारायण पवार, गुलाब पौळ, रामचंद्र कांबळे, सतीश काकडे, अब्दुल रऊफ, लिंबाजी कलमे, दत्तराव कांगणे, लक्ष्मण प्रधान, अॅड. उमेश काष्ट, प्रमोद कांदे, नारायण पवार, उध्दव सोळंके, अॅड. योगेश सूर्यवंशी, उत्तम गवारे आदींनी केली आहे.