जन आक्रोश मोर्चाने परभणी शहर दणाणले...

 विविध संघटनांचा सहभाग. हजारो नागरिक सहभागी. 


प्रेस मीडिया लाईव्ह :

शिवाजी शिंदे : जिल्हा प्रतिनिधी परभणी.

परभणी :  महानगरपालिका प्रशासनाने लागू केलेली वाढीव घरपट्टी व नळपट्टी तात्काळ रद्द करावी, तसेच सर्व करांवर लावण्यात आलेले उपकर रद्द करण्यात यावेत यासह अन्य मागण्यांसाठी महानगरपालिकेवर शिवसेनेचे खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली  शुक्रवार, दि.25 ऑगस्ट रोजी हजारो कार्यकर्त्यांनी मोठा मोर्चा काढला.या मोर्चात विविध संघटनांसह  व्यापारी, परभणीकरांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला.

शनिवार बाजारपासून या मोर्चा प्रारंभ झाला,तत्पूर्वी मध्यवस्तीसह चौहोबाजूंच्या वसाहतीतून हजारो कार्यकर्ते तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधी वाजत गाजत या शनिवार बाजारात दाखल होत होते. गळ्यात भगवे रुमाल, हातात भगवे झेंडे, निळे झेंडे, जय भवानी, जय शिवाजी,हिंदुहद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, अशी जोरदार घोषणाबाजी करीत या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांसह नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. महापालिकेच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत या नेते मंडळींचे कार्यकर्त्यांनी संपूर्ण शनिवार बाजाराचा परिसर दणाणून सोडला.तेथून या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्थान केले,नानलपेठ,शिवा-जी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, अष्टभुजा चौक ,स्टेशन रोड, नारायण चाळ कॉर्नर मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला, मोर्चातील नेते मंडळीसह हजारो कार्यकर्त्यांच्या महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीने केली. संपूर्ण व्यापारी पेठा  अक्षरशः दणाणल्या. या मोर्चात काही उत्साही कार्यकर्त्यांनी महापालिका यंत्रणेची प्रतिकात्मक अंतयात्रा सुद्धा काढली. शव वाहिनीवर  हे कार्यकर्ते पालिकेच्या निषेधार्थ शोक व्यक्त करत होते. तर काही महिला पदाधिकाऱ्यांनी काळ्या रंगाच्या साड्या,ड्रेस,घालून  महानगरपालिकेचा तीव्र निषेध नोंदवला.

सौ. संप्रीया राहुल पाटील सौ. अंबिका अनिल डहाळे यांच्यासह अन्य महिला पदाधिकारी व महिला नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत्या. मोर्चे करांनी हातात काही फलके झळकवली,  त्याद्वारे महानगरपालिका व राज्य सरकारवर टीकेचे जोड उठवले. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पुतळा  जवळील परिसरात या मोर्चाचा समारोप झाला. त्या ठिकाणी छोटेखानी जाहीर सभा सूरू झाली. दरम्यान या सभेनंतर  शिष्टमंडळ जिल्हा प्रशासनास एक निवेदन सादर करणार आहे.त्याद्वारे आपल्या तीव्र भावना निदर्शनास आणून देणार आहे.

शहरातील रस्त्यांसाठी आलेले 80 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने हडप केला, यासह नाट्यगृहाच्या उर्वरित बांधकामासाठी 15 कोटींचा निधी मंजूर होऊनही सरकारने देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे 80 कोटींचा रस्त्यांचा निधी तात्काळ द्यावा. नाट्यगृहाचे रखडलेले काम पूर्ण करावे, याशिवाय रमाई घरकुल योजने ची रक्कम 2.5 लाख ऐवजी 3.5 लाख रु.करण्यात यावेत. रमाई घरकुल योजनेसाठी मनपा प्रशासनाने रेती उपलब्ध करून द्यावी. शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करावी.शहरात प्रचंड धुळीचे साम्राज्य पसरले असून यावर तातडीने उपाययोजना करावी. कल्याण मंडपम व बी.रघुनाथ सभागृहासाठी केलेली भाडेवाढ तात्काळ रद्द करावी. शहरात भुमिगत गटार योजनेचे काम तात्काळ सुरू करावे. रमाई घरकुल योजनेसाठी घरपट्टी लागू करण्यात यावी. 37/1 नियमांचा आधार घेवून शहरातील आरक्षीत जागांचे आरक्षण उठवण्याच्या नावा- खाली जो प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे तो तात्काळ बंद करण्यात यावा.

नागरीकांना दररोज शुध्द व सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा. औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांना लावलेले कर तात्काळ रद्द करावेत. शहरातील नागरीकांच्या मालकी जागेची मोजणी करून त्यांना मालमत्ता हक्क प्रमाणपत्र देण्यात यावे. नटराज रंग मंदिर दुरूस्तीसाठी निधी उपब्ध करून देण्यात यावा. नवीन नाट्यगृह बांधकाम निधी अभावी बंद असून त्याचा शासनस्तरावर पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यात यावा आदी मागण्यां यावेळी  या जन आक्रोश मोर्चाच्या शिष्टमंडळाद्वारे केल्या जाणार आहेत.या मोर्चाला परभणी शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, शहरातील व्यापारी तसेच विविध चळवळीतील कार्यकर्त्यांनी देखील या मोर्चात सहभागी होते.या मोर्चाला परभणी जिल्हा संपर्क प्रमुख आ.रविंद्र वायकर, महिला आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख ज्योतीताई ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी परभणी विधानसभा संपर्क प्रमुख राजेश सकपाळ, डाँ. विवेक नावंदर, जिल्हा प्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे,अतूल सरोदे, आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post