प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त पद गेले दोन महिन्यांपासून रिक्त आहे. प्रभारी प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी काम पाहत आहेत. परंतु कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यास अडचणी येत आहेत. परिणामी नवीन आयुक्ताची नेमणूक होई पर्यंत शहरवासियांना वाट बघावी लागणार आहे.
येणारा आयुक्त आपल्याला मर्जीतला असावा यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. एखादा सीईओ केडरचा अधिकारी महापालिकेत आणून बसवण्याचा डाव आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये निर्णय होत नसल्याने निर्णय प्रलंबित पडत पडत आहे.
बिन आयुक्त असलेल्या महापालिकेला कोणी वालीच नसल्याचे चित्र आहे. शहरभर कचरा साचत आहे, पाणी पुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे, खड्ड्यांमुळे नागरिक हैराण आहेत, धोरणात्मक निर्णयांना खिळ बसत आहे, उत्पन्नवाढ नसल्याने कर्मचाऱ्यांना कायम करण्यास अडचणी येत असल्याचे आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने श्री अंबाबाई देवी समोर गाऱ्हाने मांडून अभिनव आंदोलन केले.
"कोल्हापूरची अंबाबाई तू, तुझ्या गावाला आयुक्त नावाचा अधिकारी असतोय, त्यो सगळं नियोजन बघतोय. खाबुगिरी करणारी नेतेलोक आयुक्त नेमंणा झाल्यात ग आई! कोल्हापूरला आयुक्त दे, या दसऱ्याला तोरण चढवू, दिढ किलोचं पेढं तुझ्या समोर ठेवू, ग आई!" असे गाऱ्हाने आम आदमी रिक्षा संघटनेचे सचिव बाबुराव बाजारी यांनी महाद्वार समोर झालेल्या आंदोलनात मांडले.
यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, संजय साळोखे, मोईन मोकाशी, दुष्यन्त माने, विजय हेगडे, उषा वडर, स्नेहा पतके, सदाशिव कोकितकर, समीर लतीफ, उमेश वडर, रवींद्र राऊत, राकेश गायकवाड, संजय नलवडे, अमरसिंह दळवी, महेश घोलपे,दिलीप कोळी, विलास पंदारे, मनोहर नाटकर, सफवान काझी, आदी उपस्थित होते.