प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : विधी सेवा समिती हातकणंगले आणि इचलकरंजी बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी येथे अँटी रॅगिंग ॲक्ट संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मा. जी. ए घुले आणि अप्पर पोलीस अधीक्षक मा. निकेश खाटमोडे - पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
"महाविद्यालयीन जीवनामध्ये आपल्याकडून लहान-सहान चुका होत असतातच परंतु त्या चुका सुधारून आपल्या मर्यादा समजून घेऊन सुद्धा महाविद्यालयीन जीवन आनंदाने जगता येते. रॅगिंग सारखे प्रकार क्षणभराचा आनंद देतात परंतु आपल्या सबंध आयुष्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी व चांगले भविष्य घडवावे" असे प्रतिपादन प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी मा. जी. ए. घुले यांनी केले.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे साहेब आपल्या मनोगतात म्हणाले "एखादा लहान सहान गुन्हा सुद्धा आपल्या करिअरच्या वाटेवरचा मोठा अडथळा ठरू शकतो त्यामुळे आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची सजगता विद्यार्थ्यांनी ठेवायला हवी.आणि अपार कष्ट करून आपले भविष्य घडवायला हवे".
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. अनिल पाटील म्हणाले, "दोन्ही मान्यवरांनी अतिशय संवेदनशील विषयावर नेमके पणाने केलेले मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांसाठी मौलिक स्वरूपाचे आहे"
यावेळी इचलकरंजी बार कौन्सिलचे अध्यक्ष शिवराज चुडमुंगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
महाविद्यालयातील अँटी रॅगिंग समितीच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सकाळ सत्र प्रमुख डॉ. डी. सी. कांबळे यांनी केले.यावेळी दुपार सत्र प्रमुख प्रा. डी. ए यादव, ॲड. राजीव शिंगे,ॲड.असिफ मुल्ला, ॲड. सुधीर मस्के, ॲड. दत्ता बडे, अभिजीत पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका,विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*कार्यक्रमाच्या संयोजनात मा. श्री.गजानन शिरगावे यांचे विशेष सहकार्य लाभले. डॉ,.एस. टी इंगळे यांनी आभार व्यक्त केले. तर डॉ. अतिश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.*