प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
prasad.kulkarni65@gmail.com
भारताची चंद्रयान-३ मोहीम बुधवार ता.२३ ऑगस्ट २०२३ रोजी यशस्वी झाली.चंद्रयान-३ मधील विक्रम लॅडर त्यातील प्रज्ञान बग्गी सह दक्षिण ध्रुवावर उतरला.या भागात उतरत चंद्रविजय मिळवणारा भारत पहिला देश ठरला. इस्त्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ , माजी अध्यक्ष के. सिवन आणि त्यांची सर्व टीम यांचे अभिनंदन व कौतुक करावे तेवढे कमी आहे. एस.सोमनाथ यांनी हे यश संशोधकांच्या अनेक पिढ्यांच्या योगदानाचे आणि निरंतर प्रक्रियेचे आहे असे म्हटले आहे.या यशाबद्दल जगभरातून त्यांच्या वर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने संसाधने हाताशी नसतानाही विज्ञानाच्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे जी स्पृहणीय वाटचाल सुरू ठेवली आहे त्याचे यश आहे. डॉ.विक्रम साराभाई, डॉ. होमी भाभा आदी अनेकांचे अपूर्व योगदान ,१९६९ ची इस्त्रोची स्थापना आणि त्यानंतरची कामगिरी अतिशय महत्वाची आहे.आपण २००८ साली चंद्रयान मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली गेली.चार वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ साली चंद्रयान २ मोहिमेतील लॅडर चंद्रपृष्ठावर कोसळला होता. पण त्यातील ऑर्बिटरने बरेच नकाशे गोळा केले होते. आणि ते अजूनही सक्रिय आहे.या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांचे हे नवे यश फार महत्त्वाचे आहे. आता पुढील १४ दिवस अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत.
या मोहिमेतील यशामुळे पृथ्वीच्या निर्मितीची रहस्ये उलगडण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले टाकली जाणार आहेत. सूर्यमालेतील अनेक अनुत्तरित व गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे शोधली जाऊ शकतील. इतर ग्रहांवर अशा मोहिमा आखण्यासाठी उड्डाण केंद्र म्हणून याचा उपयोग होईल. कारण चंद्र पृथ्वीपासून जवळजवळ चार लाख किलोमीटर अंतरावर आहे. आणि मंगळ त्यापेक्षा दोनशेपट अंतरावर आहे. मंगळ, शुक्र, सूर्य यांचा अभ्यास करणाऱ्या मोहिमा इस्त्रोने आखल्या आहेत. त्यासाठी याचा उपयोग होईल.तसेच अवकाशातील खनिजे मिळवण्याच्या दिशेने पावले टाकता येतील. चंद्राच्या दक्षिण भागात अब्जावधी वर्षापूर्वीचे खडक आहेत त्यांच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जाईल. बर्फाच्या स्वरूपातील पाण्याच्या साठ्याचा शोध घेतला जाईल. एकूणच भारताचा हा चंद्रविक्रम अतिशय अभिमानास्पद आहे