प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी/प्रतिनिधी :
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वस्त्रनगरीच्या नांवलौकिकात भर घालणार्या वेटलिफ्टर कु. अश्विनी राजेंद्र मळगे हिला राज्य शासनाचा सन 2019-20 चा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. एका दुचाकी मेकॅनिकच्या मुलीने आपल्या उत्तुंग कामगिरीच्या माध्यमातून यशाला घातलेली गवसणी कौतुकास्पद आहे. तिच्या या यशाने वस्त्रनगरीच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. हा पुरस्कार मिळविणारी अश्विनी ही इचलकरंजीतील पहिलीच महिला खेळाडू आहे. या पुरस्काराबद्दल प्रा. शेखर शहा आणि सौ. जोत्सना शहा यांनी भेट घेऊन अश्विनी हिचा सत्कार केला.
महाराष्ट्र राज्य शासनाकडून दरवर्षी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडू यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. त्यानुसार सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन वर्षांतील पुरस्कार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जाहीर केले. त्या पुरस्कारांचे वितरण राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत पार पडला.
इचलकरंजीतील खेळाडू असलेल्या अश्विनी मळगे हिला लहानपणापासून क्रीडा क्षेत्राची आवड होती. त्यामध्ये तिने वेटलिफ्टर या क्रीडा प्रकारात आपले करिअर करण्याचा निर्णय घेत आपले पूर्णत: लक्ष्य केंद्रीत केले. तिचे माध्यमिक शिक्षण श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कुल मध्ये तर विद्यालयीन शिक्षण दत्त कॉलेज कुरुंदवाड व महाविद्यालयीन शिक्षण आण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले येथे झाले आहे. या काळात अश्विनी मळगे हिला वेदना जुगळे, रमेश पाटील, आण्णासाहेब गावडे, प्रा. शेखर शहा तसेच प्रशिक्षक सांगली विश्वशांती व्यायाम मंडळाचे संतोष सिंहासने यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आले आहे.
घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आणि वडील दुचाकी वाहनांचे मेकॅनिक अशा परिस्थितीत आई सौ. मीना मळगे व राजेंद्र मळगे यांनी दिलेल्या प्रोत्साहनाच्या बळावर अश्विनी हिने दमदार आणि चमकदार कामगिरी केली आहे. तिने आतापर्यंत 27 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. तर उझबेकिस्तान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ती भारतीय संघात सहभागी होती. तिच्या यशाने इचलकरंजी क्रीडानगरीची मान उंचावली गेली आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारत देशाचे प्रतिनिधीत्व करत देशासाठी सुवर्णपदक आणण्याचे आपले ध्येय असल्याचे अश्विनी मळगे हिने सांगितले.