प्रेस मीडिया लाईव्ह:
इचलकरंजी (प्रतिनिधी) :
कोल्हापूरची अस्मिता असलेल्या जयप्रभा स्टुडिओ बचाव आंदोलनाला अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या सर्व पदाधिकारी व सभासद आणि कोल्हापूरसह जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील असंख्य चित्रपट कलाकार, निर्माते, तंत्रज्ञ, संगीतकार, गीतकार, छायाचित्रकार, लेखक व कलाप्रेमी हितचिंतक यांच्या एकजुटीने सुरू असलेल्या साखळी उपोषण व विविध प्रकारच्या संघटित आंदोलनाला दिड वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर अखेर यश मिळाले आणि जयप्रभा स्टुडिओ सरकारच्या ताब्यात मिळाला.
याबद्दल आज रविवार ता. ६ आॕगष्ट रोजी सकाळी ११ वाजता इचलकरंजी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर व बसस्थानक आवारातील श्री दत्त मंदिरासमोर इचलकरंजी व परिसरातील अनेक कलाकारांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन पेढे व साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी लालचंद पारिक, राजू फरांडे, बाबासाहेब तांदळे, असिफ संजापूरे, बजरंग कांबळे, अविनाश सुर्यवंशी यांनी जयप्रभा स्टुडिओ सरकारच्या ताब्यात मिळाले बद्दल शासनाचे अभिनंदन केले व ह्या लढ्यासाठी सर्व कलाकारांनी दिलेल्या योगदानाबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भानुदास तासगावे, अमर कोळी, रसिक फोटोग्राफर, देवा कवलगी, विक्रमसिंह तांदळे, मिरासो शेख, बाबुराव ढेंगे, सुनील कुंभार, सचिन लाखे, हनमंत भागवत, शिवाजी येडवान, वंदना भंडारे, सिमा भंडारे, मोहिनी खोत, गीतांजली डोंबे, सखाराम जाधव, संदीप पाटील, मोनिका जाधव आदी कलाकारांसह कलारसिक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याअगोदर जयप्रभा स्टुडिओ बचाव आंदोलनाचे सुरुवातीला इचलकरंजीतील चित्रपट निर्माते- आर. एस. पाटील व जेष्ठ संगीतकार- चंद्रकांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी व परिसरातील सुमारे शंभराहून अधिक कलाकारांनी नारायणराव घोरपडे चौकापासून कोल्हापूर येथील जयप्रभा स्टुडिओ पर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढून सदर आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला होता. अखेर या लढ्याला यश प्राप्त झाले आणि जयप्रभा स्टुडिओ सरकारच्या ताब्यात मिळाल्याबद्दल यावेळी उपस्थित सर्व कलाकारांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते.