प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी/प्रतिनिधी -
पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि पत्रकार हल्लाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी होणार्या कुचराईच्या निषेधार्थ इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ आणि इचलकरंजी प्रेस क्लब या संघटनांच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. त्याचबरोबर पत्रकार संरक्षण कायदा परिपत्रकाची होळी करण्यात आली. त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने प्रांताधिकारी सौ. मोसमी बर्डे-चौगुले यांना निवेदन देण्यात आले.
पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी एका पत्रकारास अर्वाच्च शिवीगाळ करण्यासह चार गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्यानंतरही या प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावण्यात आले नाही. राज्यातही पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना घडतात, तेथे पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावण्यास पोलिस टाळाटाळ करतात. सन 2019 मध्ये कायदा अस्तित्वात आल्यानंतर जवळपास दोनशे पत्रकारांवर हल्ले झाले. त्यानंतरही अवघ्या 37 प्रकरणांतच पत्रकार संरक्षण कायदा लावला गेला. पाचोरा येथील घटना घडल्यानंतर मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या बैठकीत 17 ऑगस्ट रोजी पत्रकार संरक्षण कायद्याची राज्यभर होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार इचलकरंजीतील सर्व पत्रकारांच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर परिपत्रकाची होळी करत निदर्शने करण्यात आली. त्यानंतर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष धर्मराज जाधव आणि प्रेस क्लबचे अध्यक्ष शरद सुखटणकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रांताधिकारी सौ. बर्डे-चौगुले यांना पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी संदर्भातील निवेदन सादर केले.
या आंदोलनात रामचंद्र ठिकणे, संजय खुळ, विजय चव्हाण, अतुल आंबी, पंडीत कोंडेकर, अरुण काशिद, बाबासो राजमाने, हुसेन कलावंत, सुभाष भस्मे, इराण्णा सिंहासने, सुनिल मनोळे, साईनाथ जाधव, मयुर चिंदे, अभिजित पटवा, अमर चिंदे, महेश आंबेकर, उत्तम पाटील, शिवानंद रावळ, संतोष काटकर, बाळासाहेब पाटील, शितल पाटील, शैलेंद्र चव्हाण, रविकिरण चौगुले, संतोष साने, निखिल भिसे, कृष्णात लिपारे, संदीप जगताप आदींसह पत्रकार उपस्थित होते.