प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी इचलकरंजी
(९८५०८ ३०२९०)
गुंतलेले प्राण या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुन बेहोष होता
शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे....
असे शेतीत आणि रानात स्वतःचे प्राण शोधणारे आणि तेथील सुखदुःखाच्या जीवनलयीतच शब्दगंधेला मला बाहूत घे म्हणणारे ना. धों.महानोर हे गेली पाच सहा शतके दशके मराठी कवितेला मराठी संस्कृतीचा रानरूपात व्यक्त करणारे अव्वल कमी होते. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर कृषी औद्योगिक समाजरचनेची मांडणी पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केली होती. एकीकडे उद्योगधंदे वाढत असतानाच नव्या पिढीला कृषी जीवनाशी किंवा रानमातीशी जोडून घेण्याचे ,त्याविषयी ममत्वभाव वाढविणारे फार मोठे संस्कार महानोर यांच्या कवितेने केले. कृषी जीवनासंबंधीची ओढ ही निर्माण केली. प्रामुख्याने रानकवी म्हणून ओळखलेला असलेल्या महानोर आणि कथा कादंबरी ललित लिखाणही सकस पद्धतीने केले. अजिंठा सारखी त्यांची दीर्घ कविता हे मराठी कवितेतला एक सुंदर लेणं आहे. त्यांची चित्रपटगीते दशकानुदशके रसिकांना रसिकांच्या मनावर, ओठांवर रेंगाळत राहिली आहेत.महानोर यांनी दहा वर्षे विधान परिषदेत आमदार म्हणून काम करताना शेती, शेतकरी, जलसिंचन , कला,साहित्य यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चा घडवून आणली. एक अतिशय संवेदनशील माणूस आणि पर्यावरण रक्षक असलेले ते अव्वल दर्जाचे कवी होते. मातीतून सोनकविता त्यानी निर्माण केली.
या शेताने लळा लाविला असा असा की
सुख दुःखाला परस्परांशी हसलो रडलो ,
आता तरी हा जीवच अवघा असा जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो....
असे शेताच्या हिरव्या बोलीचा शब्द होण्यात आयुष्य उगाळून भवताल गंधित करणारे थोर कवी म्हणून मराठी साहित्यात त्यांचे नाव सुवर्णपानावर हिरव्या कंच अक्षरात कोरले गेलेले आहे. ना. धों .महानोर या थोर कवीला विनम्र अभिवादन...!