नितीन देसाईंवर होतं तब्बल २४९ कोटींचं कर्ज ; एन. डी. स्टुडिओचीही होणार होती जप्ती.



प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी :  सुनील पाटील

 सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांच्या कर्जत येथील एन. डी. स्टुडिओ मध्येच त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

देसाई यांच्या आत्महत्येवर कलाक्षेत्र, राजकीय क्षेत्र व सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नितीन देसाई यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी भव्य-दिव्य सेट उभारले होते. दिग्गज दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं होतं. असं असताना त्यांच्यावर मृत्यूपूर्वी तब्बल २४९ कोटींचं कर्ज होतं, अशी माहिती आता समोर आली आहे.

दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृतदेह बुधवारी सकाळी एन. डी. स्टुडिओमधील त्यांच्या खोलीत आढळून आला. सफाई कर्मचारी खोलीत साफसफाईसाठी गेले असताना ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने पोलीसांना या घटनेची माहिती कळवली. यानंतर कर्जत आणि खालापूर येथील पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान या घटनेचे सर्व पैलू तपासून पाहत असल्याचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले आहे.

कर्जबाजारीपणाला कंटाळून टोकाचं पाऊल..?

दरम्यान, कर्जबाजारीपणाला कंटाळून नितीन देसाई यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलणं चुकीचं असून कुणीही असा विचार करू नये, असं आवाहन सातत्याने सामाजिक, राजकीय व प्रशासकीय स्तरातून केलं जात आहे. मात्र, नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात नेमकं काय घडलं? याचा तपास आता पोलीस करत आहेत.

 सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाईंची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

एन. डी. स्टुडिओवर कारवाईचं संकट

ठराविक मुदतीसाठी घेतलेले कर्ज न फेडल्यामुळे नितीन देसाई यांच्या कर्जत चौक येथील एन. डी. स्टुडिओवर जप्तीच्या कारवाईचे संकट ओढावले होते. कलिना येथील एडलवाईस अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने एन. डी. स्टुडिओ जप्तीसाठी रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जही केला होता. पण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जप्तीच्या कारवाईला अंतिम मंजूरी दिली गेली नव्हती. रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी एन. डी. स्टुडिओच्या जप्तीसंदर्भात अर्ज कार्यालयाकडे आला असल्याचे सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post