उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे बारामतीकरांनी त्यांचे जोरदार जंगी स्वागत केले.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

 बारामती : उपमुख्यमंत्री झालेले अजित दादा पवार यांनी पहिल्यांदाच बारामतीत हजेरी लावली. बारामतीकरांनी त्यांचे जोरदार जंगी स्वागत केले.रस्त्यावर तसेच चौकाचौकात हजारो बारामतीकरांनी अजित पवार यांच्यावर पुष्पवृष्टी केली. स्वागतासाठी शहर व तालुक्‍यातील नागरिकांनी तुफान गर्दी केल्याने बारामतीत अजितदादांचीच जोरदार हवा असल्याचे स्पष्ट झाले.शहर व तालुक्‍यातील पदाधिकाऱ्यांनी अवघ्या चार दिवसांच्या कालावधीत नेटके आयोजन करीत अजित पवार यांचे बारामतीकरांनी जंगी स्वागत केले.


राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर अजित पवार हे प्रथमच बारामतीत आलेले होते. त्या पार्श्‍वभूमीवर अजित पवार यांचे बारामतीकरांनी केलेल्या भव्य स्वागत म्हणजे त्यांना बारामतीकरांनी दर्शवलेला पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अजित पवार यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव पार्थ पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, बारामती बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्यासह आदी मान्यवर सहभागी झाले होते.

कार्यकर्ते, नागरिक, व्यापारी, संस्था व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे हार, बुके देत व फुलांची उधळण करत स्वागत केले. ठिकठिकाणी नागरिकांनी त्यांना हार घालून स्वागत केले. आज जेसीबी मशीनच्या मदतीने अनेक ठिकाणी त्यांच्यावर फुलांची उधळण केली गेली. क्रेनद्वारेही त्यांना हार घातले गेले. अखिल तांदूळवाडी वेस तरुण मंडळ व संजीवनी ग्रुपने त्यांच्या स्वागतासाठी क्रेनद्वारे हार घालण्याची व्यवस्था केली होती. अजित पवार यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. बॅंड, ढोलपथकाच्या साथीने त्यांची मिरवणूक काढण्यात आली.

संतोष गालिंदे व सहकाऱ्यांनी मशीनच्या सहाय्याने अजित पवार यांच्यावर दोन टनांहून अधिक फुलांची जेसीबीने उधळण केली. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी व फ्लेक्‍स लावून व्यापारी वर्गाने पवार यांचे स्वागत केले.

बारामती तालुक्‍याच्या विविध भागातून तरुण दुचाकी रॅली काढून बारामतीच्या शारदा प्रांगणात दाखल झाले होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, बारामती बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव, युवकाध्यक्ष अविनाश बांदल यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी या सत्कार सोहळ्याचे नियोजन केले होते.

Post a Comment

Previous Post Next Post