आरोपी मयूरेश गंभीरने दिली कबूली ; आरोपी सोबतचे आमदारांचे फोटो व्हायरल
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील :
अलिबागचे स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या खांद्याला खांदा लावून चालणारा, त्यांच्यासोबत फिरणारा 45 वर्षीय मयूरेश गंभीर याला पोलिसांनी दोन खून केल्याप्रकरणी अटक केली आहे. याबाबत त्याने खून केल्याची कबूली दिली असल्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आ. दळवींचे आरोपी मयुरेश गंभीरसोबतचे फोटो सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असून लोकप्रतिनिधी गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाण्ाी घालत असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.
पोलीस तपासात धक्कादायक बाबींचा उलगडा झाला. 45 वर्षीय मुख्य आरोपी मयुरेश गंभीर याने आपली दुसरी बायको प्रिती गंभीर (32) हिची ऑगस्ट 2022 मध्ये हत्या केली होती. प्रिती ही भारती आंबोरकर यांची कन्या होती.
मायलेकीच्या दुहेरी हत्याकांडाचं गूढ उकलण्यात अखेर उरण पोलिसांना यश आलं आहे. मुख्य आरोपीसह त्याच्या तिघा साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 10 जुलै रोजी उरण तालुक्यातील पिरकोन-सारडे गावातील रस्त्यावर 54 वर्षीय भारती आंबोरकर मृतावस्थेत सापडल्या होत्या. त्यांच्या मानेला मागून भोसकल्याच्या खुणा होत्या.
मयुरेशसह पोलिसांनी दिलीप जंगलकर, दीपक निशाद आणि अब्रार अन्सार या त्याच्या तीन साथीदारांनाही अटक केली आहे. मयुरेश गंभीर हा सराईत गुन्हेगार आहे. 2014 मध्ये अलिबाग येथील एका स्थानिकाच्या हत्येप्रकरणी त्याला अटक झाली होती. अलिबाग कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र 2022 मध्ये पुराव्याअभावी हायकोर्टाने त्याची सुटका केली. हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.
चष्म्याच्या कव्हरने केला घात
दहा जुलैला पिरकोन-सारडे गावातील रस्त्यावर सापडलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाची चौकशी करताना घटनास्थळी पोलिसांना चष्म्याचे कव्हर सापडले होते. त्यावरुन पोलीस आंबोरकरांच्या डोंबिवलीतील घरापर्यंत पोहोचले. 9 जुलैला भारती यांना जावई मयुरेशने अलिबागमधील पोयनाड येथे बोलावले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
गुन्ह्याची कबूली
पोलिसांनी मयुरेशला डोंबिवली पूर्वेकडील पलावा भागातून उचललं. चौकशीदरम्यान त्याने सासूबाईंची हत्या केल्याची कबुली दिली. तिघा साथीदारांच्या मदतीने आपल्या गाडीतच त्यांचा जीव घेतल्याचं त्याने सांगितलं. डोक्यात दोन गोळ्या झाडून रस्त्याच्या कडेला त्यांचा मृतदेह टाकला. त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी मानेवर मागच्या बाजूने भोसकल्याचंही त्याने सांगितलं. याच वेळी, आपली दुसरी पत्नी प्रितीची हत्या केल्याचीही कबुली त्याने दिली. अलिबागमधील लॉजवर नेऊन तिचा गळा दाबल्याचं त्याने सांगितलं. 2014 मध्ये कारावासात जाण्यापूर्वी दिलेले नऊ लाख रुपये परत देण्यास नकार दिल्याने प्रितीचा खून केल्याचं मयुरेशने सांगितलं. तर प्रितीच्या हत्या प्रकरणात सासू फिर्यादी असल्याने तिचाही काटा काढल्याचं त्याने सांगितलं.