प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
रायगड प्रेस क्लबशी संलग्न असणा-या रसायनी प्रेस क्लबने शुक्रवार दिनांक १४ जुलै २०२३ रोजी प्रगतीशील शेतक-यांचा गुळसुंदेतील शेतात बांधावर जाऊन सन्मान केला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शत्रूघ्न माळी, पंचायत समिती सदस्य जगदीश पवार होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत रसायनी प्रेस क्लब चे अध्यक्ष व रायगड प्रेस क्लब चे जिल्हा संघटक नागेश कदम यांच्या हस्ते शाल,फुलाचे रोपटे देऊन करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागतानंतर पत्रकार बाळासाहेब सावर्डे यांनी प्रास्ताविकात सांगितले की,रायगड प्रेस क्लबतर्फे बारा वर्षांपासून अखंडित हा उपक्रम राबविला जात आहे. तालुका/विभाग स्तरावर प्रगतशील शेतक-यांचा शेतात बांधावर जाऊन सन्मान केला जातो.अनेक शेतकरी नवनवीन बियाणे,जास्त उत्पन्न काढणे , फळलागवड,शेतीपूरक पशुपालन करून प्रगती करत असतात.शेतकरी शेतात घाम गाळतो म्हणून आपणाला पोटभर अन्न मिळते.त्यांनी केलेल्या कृषीप्रगतीसाठी कौतुकाची थाप म्हणून सन्मान केला जातो.या कार्यक्रमात नवीन पोसरी-मोहोपाडा येथील नंदकुमार लडकू पाटील आणि तुराडे येथील रविंद्र धनाजी ठाकूर यांचा प्रमुख पाहुणे शत्रूघ्न माळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रसायनी पोलिस ठाणे व पंचायत समिती सदस्य जगदीश पवार यांच्या हस्ते शाल,फुलाचे रोपटे व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास रसायनी प्रेस क्लबचे अध्यक्ष नागेश कदम,मराठी पत्रकार परिषद कोकण विभागीय सचिव अनिल भोळे,रायगड प्रेस क्लबचे सल्लागार भालचंद्र कुलकर्णी,पत्रकार आनंद पवार व बाळासाहेब सावर्डे, पं.स.चे माजी सदस्य जगदीश पवार व दत्ता जांभळे,सावळेचे सरपंच सुनिल माळी,माजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब यादव,प्रल्हाद ठाकूर,धनाजी ठाकूर,मधुकर गायकर,योगेश वर्तक,कैलास याज्ञिक आदींची उपस्थिती होती.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पत्रकार आनंद पवार यांनी केले.