- ७५ महिला डॉक्टर करणार रॅम्प वॉक
- दुर्गम भागातील महिलांना एक लाख सॅनिटरी नॅपकिन्सचे होणार वाटप
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी आणि महिला आरोग्य जनजागृती करण्यात येते. फाउंडेशनच्या वतीने फक्त महिला डॉक्टरांचा समावेश असलेल्या चॅरिटी फॅशन शो चे आयोजन केले जाणार आहे. या चॅरिटी फॅशन शोच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीतून राज्याच्या दुर्गम भागातील एक लाख महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स दिले जाणार आहेत. अशी माहिती कशिश सोशल फाउंडेशन आणि कशिश प्रोडक्शनचे अध्यक्ष योगेश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला जेष्ठ अभिनेते सुनील गोडबोले,डॉ रितू लोखंडे,डॉ रेश्मा मिरघे आदि उपस्थित होते.
फॅशन शो बद्दल माहिती देताना योगेश पवार यांनी सांगितले की, कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित चॅरिटी फॅशन शो मध्ये ७५ महिला डॉक्टर रॅम्प वॉक करणार आहेत तर शो साठी राज्याच्या विविध भागातून सुमारे ३०० हून अधिक महिला डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. या शोमध्ये दोन राऊंड होतील त्यातील पहिला राऊंड हा डिझायनर अर्थात फॅन्सी ड्रेस मध्ये असेल तर दूसरा राऊंड त्यांच्या व्हाईट एप्रॉन मध्ये होणार आहे.हा शो ३० जुलै रोजी ड्रोन अरेना,मेडील्फ इस्टेट,खराडी, पुणे या ठिकाणी ४:३० वा, संपन्न होणार आहे.
पुढे बोलताना योगेश पवार म्हणाले, भारतीय समाज आज खूप विकसीत झाला आहे. मात्र, तरी देखील मासिक पाळी आणि त्या काळा दरम्यानची स्वच्छता यांविषयी अनेक गैरसमज आहेत. मासिक पाळी या अतिशय महत्वाच्या आणि नाजुक विषयांवर जनजागृती करण्याचे काम कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने केले जात आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून आजपर्यंत पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या दुर्गम भागात ३५ हजार सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले, र्वरित ७० हजार या शो नंतर वाटप करण्यात येणार आहेत.
अलीकडच्या काळात अनेक महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाला सामोरे जावे लागते. गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंध म्हणून एचपीव्ही लसीकरण केले जाते. ह्युमन पॅपिलोमाव्हायरस लस (HPV) ही विशिष्ट प्रकारच्या मानवी पॅपिलोमाव्हायरसच्या संसर्गास प्रतिबंध करणारी लस आहेत. उपलब्ध HPV लस एकतर दोन, चार किंवा नऊ प्रकारच्या HPV पासून संरक्षण करतात. सर्व HPV लसी किमान HPV प्रकार १६ आणि १८ पासून संरक्षण करतात, ही लस सुद्धा दुर्गम भागातील महिलांना देणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
अभिनेते सुनील गोडबोले म्हणाले, ग्रामीण तसेच शहरी भागातही बहुतांश कुटूंबात आजही मासिक पाळी विषयी मोकळेपणाने बोलले जात नाही. त्यामुळे या काळातील महिलांची शारीरीक व मानसिक स्थिती समजून घेतली जात नाही, असे दिसते या पार्श्वभूमीवर कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने मासिक पाळी दरम्यानची स्वच्छता विषयी जनजागृती करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमाचा एक भाग होता आले याचा आनंद वाटतो.
दरम्यान, महिला डॉक्टरांचा पहिला चॅरिटी फॅशन शो घेणाऱ्या योगेश पवार यांनी आजवर दोनक्षेहून अधिक फॅशन शोचे आयोजन आणि नियोजन केले आहे, तसेच त्यांनी आठ हजारा हुन अधिक मॉडेल्स यांना मार्गदर्शन केले आहे, तर दोनशे हून अधिक सिने, नाट्य कलावंतासोबत वैविध्यपूर्व फॅशन शो साठी काम केले आहे.