कृपया प्रसिद्धीसाठी 29-07-2023
मनाचे सामर्थ्य वैज्ञानिक प्रगतीपेक्षा मोठे ---- वर्षा गजेंद्रगडकर
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुण प्रतिनिधी :
पुणे : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे भान जरूर आत्मसात करा, पण मनाचे सामर्थ्य या सर्वांपेक्षा मोठे आहे, हे विसरू नका, असा सल्ला प्रसिद्ध लेखिका वर्षा गजेंद्रगडकर यांनी शुक्रवारी येथे विद्यार्थिनींना दिला. 'मनाचे सामर्थ्य हे शस्त्र आहे. ते सतत धारदार ठेवा. आपल्या ध्येयाचे शिखर त्यातूनच आपण गाठू शकतो, असेही त्या म्हणाल्या.
सावित्री फोरम आयोजित ‘विद्यानिधी’ उपक्रम आणि ‘सावित्री पुरस्कार’ प्रदान सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी गजेंद्रगडकर यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांना पहिला ‘सावित्री पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे ‘विद्यानिधी’ उपक्रमांतर्गत पुण्यातील व आसपासच्या ग्रामीण भागांतील इयत्ता आठवी ते दहावीच्या हुशार पण गरजू अशा ७५ विद्यार्थिनींना शैक्षणिक १ लाख रु. मदतनिधीचे वाटप करण्यात आले.
गजेंद्रगडकर म्हणाल्या,‘ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्त्री शिक्षणासाठी योगदान दिले. आता काळ बदलला असला तरी विद्येचे महत्त्व अबाधित आहे, हे जाणून खूप शिका. विद्या आर्थिक दृष्ट्या सक्षम करतेच, पण ती माणूस घडवते. खंबीर बनवते. विचारांच्या कक्षा रुंदावते'.
डॉ. जाधव म्हणाल्या,‘ज्यांनी स्त्रियांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचले त्या सावित्रीबाईंच्या नावाचा पुरस्कार आनंददायी आहे, पण जबाबदारी वाढवणारा आहे, याची जाणीव आहे. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करत असताना, मला मोठा संघर्ष करावा लागला आहे. पण या पुरस्काराने पाठबळ दिले आहे. आत्मविश्वास दिला आहे. वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा काही वेळा गैरवापर होत असल्याचे गर्भलिंगनिदान तंत्रज्ञानाने समोर आणले. लिंगनिदान चाचणी स्त्री गर्भाच्या जिवावर उठल्याचे दिसून आले. तेव्हा त्याला प्रतिबंध करण्यासाठी कायदा लागू झाला. मात्र, समाजाचा समतोल राखण्यासाठी आपली मानसिकता बदलण्याची नितांत गरज आहे,'.
प्रारंभी दीपप्रज्वलन आणि प्रेरणागीत सादर करण्यात आले. फोरमच्या अध्यक्षा मोनाली कोद्रे यांनी प्रास्ताविक केले. दीपाली पांढरे यांनी आभार मानले. संयोगिता कुदळे आणि गायत्री लडकत यांनी सूत्रसंचालन केले. उत्तराधार्त सावित्री फोरम आयोजित ‘उत्सवरंग’ हा विशेष नृत्यसंरचनांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
उत्सवरंग
गुढीपाडवा, आषाढी वारी, श्रावणातले सण, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, संक्रांत, होळी अशा अनेकविध सणांची माहिती, सांस्कृतिक महत्त्व सांगण्याबरोबरच त्यावर आधारित नृत्यरचना सादर करण्यात आल्या. उत्सवरंग या कार्यक्रमाची संकल्पना, नृत्यरचना आणि सूत्रसंचालक सुप्रिया ताम्हाणे यांचे होते.
फोटो ओळी
सावित्री फोरम आयोजित ‘विद्यानिधी’ उपक्रम आणि ‘सावित्री पुरस्कार’ प्रदान सोहळा शुक्रवारी सायंकाळी पार पडला. या समारंभात प्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉ. वैशाली जाधव यांना ‘सावित्री पुरस्कार’ प्रसिद्ध लेखिका वर्षा गजेंद्रगडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गजेंद्रगडकर यांच्या हस्ते डॉ. वैशाली जाधव पुरस्कार स्वीकारताना
फोटो ओळ : (डावीकडून)
अनिता ढोले पाटील, वर्षा गजेंद्रगडकर, डॉ. वैशाली जाधव , मोनाली कोद्रे , संयोगिता कुदळे