समाधी स्थळ संरक्षित करण्यासाठी कार्यरत राहणार
केळकर कुटुंबीयांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : ओंकारेश्वर मंदिरामागे भिंती जवळ नदीपात्रात असलेली कै.गंगाधर केळकर यांची समाधी वाचविण्यासाठी पुण्यात ' केळकर समाधीस्थळ बचाव कृती समिती' ची स्थापना करणार असल्याची घोषणा आज पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. कै.गंगाधर केळकर हे राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संस्थापक दिनकर केळकर यांचे पिता होते. या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉ श्रीकांत केळकर यांच्यासह केळकर कुटुंबीयांनी,विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संबोधित केले. सौ.अरुणा केळकर,सत्यजित केळकर, रवींद्र रानडे, हेमचंद्र श्रोत्री, सुधन्वा रानडे, सुरेंद्र रानडे, शैलेंद्र दिवेकर, असीम फाटक, श्याम मोटे,मिलिंद आपटे उपस्थित होते. केळकर समाधीस्थळ बचाव कृती समिती' ची स्थापने मागची भूमिका पत्रकार परिषदेत सांगण्यात आली.
ओंकारेश्वर मंदिरामागे भिंती जवळ नदीपात्रात असलेली कै.गंगाधर केळकर यांच्या समाधीला, समाधी वास्तू उभारणीचा अप्रतिम नमुना असून १९२८ साली ती बांधण्यात आली. ही समाधी संरक्षित व्हावी ,यासाठी केळकर कुटुंबीयांचा पालिकेकडे पाठपुरावा चालू आहे.मात्र.त्यांना एका विभागाकडून दुसऱ्या,तिसऱ्या विभागाकडे फिरावे लागत आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये मध्ये महाशिवरात्रीदरम्यान या समाधी स्थळाचे रूपांतर शिवमंदिरात करण्याचा प्रयत्न झाला होता. तिथे नंदीही बसविण्यात आला आहे. केळकर कुटुंबियांच्या वतीने डॉ श्रीकांत केळकर यांनी आक्षेप घेतल्यावर तेथील अतिक्रमण संबंधितांनी स्वतःहून काढून टाकले होते. मात्र नंदी अजून आहे. समाधीजवळ गुरे बांधून या परिसराचे गोठ्यासारखा वापर सुरु असल्याचा प्रकार जुलै २०२३ महिन्यात उघडकीस आला होता.त्यानंतर समाधी स्थळाचे रूपांतर करून मूळ रूप आणि भावना बदलू नये असे आवाहन केळकर कुटुंबीयांनी पुणेकरांना केले होते .
पित्याच्या समाधी वास्तू उभारणीचा अप्रतिम नमुना असलेली ही रचना केळकर संग्रहालयाचे संस्थापक दिनकर केळकर आणि त्यांचे बंधू भास्कर केळकर यांच्या कलाप्रेमाचा नमुनाही आहे. गंगाधर या शब्दाचा अर्थ शंकर असा असल्याने उभारणीच्या वेळेसच समाधीवर कलात्मकरीत्या पिंड(शिवलींग) बसवलेले आहे.पानशेतच्या पुरातून वाचलेली समाधी अजून येणाऱ्या जाणाऱ्या चे लक्ष वेधून घेते .समाधीच्या मूळ स्वरूपाची जुनी छायाचित्रेही केळकर कुटुंबीयांकडे आहेत.नदीपात्रातील इतरही सर्व महनीय पुणेकरांच्या समाधीचा वारसा जपण्याचे आवाहन त्यांनी नागरिक आणि पुणे पालिकेला केले आहे .पालिकेकडे आणि शासनाच्या अन्य विभागांकडे पाठपुरावा करून समाधी ला संरक्षित करण्यासाठी ही समिती पाठपुरावा करेल,विविध क्षेत्रातील नागरिकांचा,मान्यवरांचा त्यात समावेश असेल,असे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
कै. गंगाधर केळकर यांच्याविषयी....
कै.गंगाधर केळकर हे राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संस्थापक दिनकर केळकर यांचे पिता होते. डॉ. श्रीकांत केळकर यांनी सांगितले की. 'माझे आजोबा कै. गंगाधर केळकर हे अत्यंत समाजहितदक्ष होते. त्यांनी पोस्टात नोकरी केली. निवृत्तीनंतर ते पुण्यात आले. त्या वेळी त्यांनी आता जेथे केळकर वस्तुसंग्रहालय आहे, ती जागा तेव्हा विकत घेतली. तेथे आधी आमचे घर होते, नंतर दिनकर केळकर (कवी अज्ञातवासी) यांनी संग्रहालय उभारले. त्याआधी गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण व्हावे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांना खूप कळकळ होती. ते सर्वतोपरी विद्यार्थ्यांना मदत करीत असत. आपल्या संपत्तीतला काही भाग विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च व्हावा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे आमच्याकडे अनेक विद्यार्थी राहायला असत. माझ्या काकांच्या काव्यसंग्रहाला भा. रा. तांबेंनी प्रस्तावना दिली आहे. त्यात त्यांनी आमच्या काकांच्या काव्यज्ञानावर भाष्य केले आहे. प्रचंड विद्वत्ता असूनही ते अत्यंत साधेपणाने जगले. त्यामुळे आज त्यांच्या समाधीस्थळी अशा पद्धतीने काही नवीन अतिक्रमण होणे, हे चुकीचे वाटते.'
केळकर समाधी विषयी
श्री अष्टभुजा दुर्गा मंदिराशेजारच्या मुठेकाठच्या रस्त्याने आपण ओंकारेश्वराच्या पुढे असलेल्या दशक्रिया विधी करायच्या घाटाजवळ आलो की,रस्त्याच्या पातळीवर थोडं पुढे उजवीकडे एका खोलगट हौदासारख्या भागात *गंगाधर केळकर* यांचे अतिशय देखणे स्मारक आहे. पुण्यातील प्रख्यात नेत्रशल्यतज्ज्ञ डॉ. केळकर आणि कवी अज्ञातवासी म्हणजे राजा केळकर संग्रहालयाचे संस्थापक दि.गं. केळकर यांचे श्री. गंगाधर केळकर हे पूर्वज आहेत.मध्यभागी असणाऱ्या चौकोनी चौथऱ्यावार दोन टप्प्यांत असलेला अष्टकोनी चौथरा आणि त्यावर एक शिवपिंडी आणि या मध्यवर्ती स्मारक स्तंभाच्या बाजूंवर ओंकार चिन्हे व संगमरवरी माहिती फलक आहेत. या मुख्य स्तंभाच्या चारही बाजूंना कमी उंचीचे चार चौकोनी स्तंभ आहेत. त्यांवर काही देवदेवतांची शिल्पे कोरलेली आहेत. या स्मारकातील मध्यवर्ती स्तंभाच्या चारही दिशांना खालच्या टप्प्यात आणि चारही उपदिशांना वरच्या टप्प्यात संगमरवरी पाट्यांवर मजकूर लिहिलेला आहे.
उत्तरेकडे,'॥श्री ॥ तीर्थस्वरूप गंगाधर रघुनाथ केळकर यांचे पुण्यस्मरणार्थ'असा मजकूर आहे. पश्चिमेकडे,'जन्मतिथि शनिवार फाल्गुन शु. ५ शके १७७६ ता. ४ मार्च १८५४'असा मजकूर आहे.
पूर्वेकडे,'देहावसान स्वगृही पुणे सोमवार नागपंचमी निजश्रावण शु. ५ शके १८५० ता. २० ऑगस्ट १९४८'असा मजकूर आहे.दक्षिणेस,'वास्तव्य शांतिकुंज जाईचे गेटाजवळ सदाशिव पेठ पुणे शहर'असा मजकूर आहे.स्मारक स्तंभाच्या वरच्या अष्टकोनात उपदिशांना असलेले मजकूर पुढीलप्रमाणे आहेत.आग्नेयेस,'ॐ हा स्तूप भास्कर व दिनकर यांनी आपल्या वडिलांचे दहनभूमीवर डिसेंबर १९२८ मध्ये बनविला' असा मजकूर आहे.नैऋत्येस,'॥श्री ॥ तीर्थरूप गंगाधर रघुनाथ केळकर यांचे पुण्यस्मरणार्थ'असा मजकूर आहे.वायव्येस,'ॐ परं ब्रह्म परं धाम,पवित्रं परमं भवान ॥,गीता अ. १०.१२'असा मजकूर आहे. ईशान्येस,'ॐ नमो नमस्तेऽस्तु सहस्र कृत्वः,पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते ॥, गीता अ. ११-३९'असा मजकूर आहे.आग्नेयेकडील स्तंभावर उत्तरेस धनुर्धारी,पूर्वेस केशवविष्णू,दक्षिणेस गरुड व पश्चिमेस रुक्मिणी अशा मूर्ती आहेत. नैऋत्येकडील स्तंभावर उत्तरेस विठोबा,पूर्वेस मारुती,दक्षिणेस माधवविष्णू,पश्चिमेस धनुर्धारी अशी शिल्पे आहेत. वायव्येकडील स्तंभावर उत्तरेस मुरलीधर,पूर्वेस गणपती,दक्षिणेस धनुर्धारी,पश्चिमेस विष्णू असे शिल्पांकन दिसते.ईशान्येकडील स्तंभावर उत्तरेस मुरलीधर,पूर्वेस माधवविष्णू,दक्षिणेस २ हात कमरेवर व २ हात वर केलेली मूर्ती, पश्चिमेस मोर व सरस्वती यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.परंतु या स्मारकाच्या हौदासारख्या भागात पाणी साचून खूप दुर्गंधी पसरलेली आहे . हे स्मारक अतिशय डौलदार आहे, पण त्याची स्वच्छता व्यवस्थित न ठेवल्यामुळे लोकांचे दुर्लक्ष होत आहे.
(संदर्भ:
मुठेकाठचे पुणे – श्री. प्र. के. घाणेकर)