विदेशी बंद्यांनाही व्हिडीओ कॉलिंग सुविधा -कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे  : महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवा विभागाने राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या पाकिस्तानी, बांग्लादेशी व अतिरेकी कारवायातील बंदी वगळता इतर विदेशी बंद्यांना कुटुंबियांशी व नातेवाईकांशी संपर्क साधण्याकरीता ई-प्रिझन प्रणालीद्वारे व्हिडीओ कॉलिंग सुविधा उपलब्ध करुन द्यावी असे निर्देश कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता राज्यातील सर्व कारागृह प्रमुखांना दिले आहेत. 

मानवतेच्या दृष्टीकोनातून सर्व बंद्यांसाठी ही सुविधा ४ जुलै २०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्यातील विविध कारागृहात सध्या ६३७ बंदी दाखल आहेत. यामध्ये मुंबई,नवी मुंबई व इतर मेट्रोपॉलिटन शहरातील कारागृहात विदेशी बंद्यांचे प्रमाण अधिक आहे. कारागृहात नायजेरियन, बांग्लादेश, केनिया, कोलंबिया, इराण, इराक, ब्रिटन, ग्रीस, गिनी, घाना, ब्राझील, थायलंड, युगांडा, चीन, पाकिस्तान, नेपाळ इत्यादी  देशांचे  नागरिक विविध गुन्ह्यांमध्ये अटक होऊन दाखल आहेत. 


विदेशी बंद्यांचे नातेवाईक अथवा वकील प्रत्यक्ष भेटून मुलाखत घेण्यासाठी येवू शकत नसल्याने विदेशी बंद्यांना कायदेशीर मदत मिळण्यास व कारागृहातून सुटका होण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे विदेशी बंद्यांमध्ये नैराश्य वाढू लागते. कारागृह प्रशासनाला या बंद्यांवर सतत निगरानी ठेवावी लागते. ही सुविधा विदेशी बंद्यांना उपलब्ध करून दिल्याने त्यांना कायदेशीर मदत लवकर मिळेल व कारागृहातून लवकर सुटण्यास मदत होईल. त्यामुळे कारागृहातील बंद्यांची गर्दी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.


ही सुविधा नुकतीच प्रथमतः ऑर्थर रोड कारागृहात बंदिस्त असलेला नायजेरियन विदेशी बंदी व त्याचे नातेवाईक यांनी सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शनाखाली एनआयसी या संस्थेने विकसित केलेल्या ई-प्रिझन प्रणालीद्वारे बंदी व नातेवाईक मुलाखत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेतली. ही सुविधा यशस्वीपणे विदेशी बंद्यांना लागू करण्याची जबाबदारी कारागृहाचे विशेष पोलीस महानिरीक्षक, डॉ जालिंदर सुपेकर यांच्याकडे असल्याचे श्री. गुप्ता यांनी कळविले आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post