प्रेस मीडिया लाईव्ह :
नवी दिल्ली : श्री ज्ञानेश्वर मुळे निवृत्त सचिव भारत सरकार व सध्या मानवी हक्क आयोगाचे सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री आनंद पाटील प्रधान सचिव तामिळनाडू सरकार, श्रीमती रेखा रायकर संयुक्त सचिव भारत सरकार , डाॅ वीर, श्री ऋषीकेश आणि पुढचे पाऊल संस्थेचे दिल्लीतील मराठी अधिकारी गण यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम संपन्न होत आहे . आज दिल्लीत ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे यांच्या हस्ते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सनदी सेवा परीक्षेतील यशस्वी मराठी गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.
दिल्ली स्थित मराठी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा उपक्रम असलेल्या 'पुढचे पाऊल' संस्थेतर्फे हा सोहळा होणार असून यंदाचे हे पाचवे पुष्प आहे.'पुढचे पाऊल'तर्फे दरवर्षी सनदी सेवा परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार आणि या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या होतकरू तरुणांना वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या मार्फत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०२३ च्या परीक्षेत महाराष्ट्रातून ७० हून अधिक उमेदवारांनी यश मिळविले होते.
या गुणवंतांचा सत्कार आज दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर मध्ये होणार असल्याचे कार्यक्रमाचे संयोजक व तमिळनाडूच्या राज्यपालांचे प्रधान सचिव आनंद पाटील यांनी सांगितले. ज्येष्ठ समाजसेवक व पद्मश्री प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव करण्यात येणार आहे.पुढचे पाऊल'चे संस्थापक व राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला माजी सरन्यायाधीश उदय लळित, केंद्रीय प्रशासकीय
न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्या. रणजित मोरे प्रमुख पाहुणे असतील. संरक्षण मंत्रालयाचे मुख्य सल्लागार लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे यांची प्रमुख उपस्थिती असेल. यादरम्यान, दिल्लीमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मराठी तरुणांसाठी दोन सत्रात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.