कड्यावरील घरांची मुख्याधिकार्यांकडून पहाणी
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
माथेरान मध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसत असून काही ठिकाणावर भूस्खलन झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर माथेरान मधील प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.येथील मुख्याधिकारी यांनी कड्यालागत राहणाऱ्या घरांची पहाणी केली असून त्यांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन केले.
माथेरान मध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडत आहे.तब्बल जुलै महिन्याच्या 27 दिवसात 3 हजारापेक्षा जास्त पाऊस बरसला आहे.अजूनही पावसाची उघडीप नसल्याने 27 जुलै रोजी मुसळधार पाऊस सुरू असताना येथील मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी आपल्या कर्मचार्यासमवेत कड्यालगत राहणाऱ्या घरांची पहाणी भर पावसात केली.इंदिरा गांधी नगर,छत्रपती शिवाजी महाराज नगर,हुतात्मा भाई कोतवाल नगर,तसेच कपाडिया मार्केट येथील कड्यालागत राहणाऱ्या घरांची पहाणी करून लोकांना सुरक्षित स्थळी किव्हा नगरपालिकेने सोय केलेल्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात जाण्याचे आवाहन केले.रात्रीच्या वेळेस कोणीही घरात न थांबता सुरक्षित स्थळी जावे असे सुद्धा आवाहन केले आहे.प्रत्येकाच्या घरासमोर जाऊन गारवे लोकांना विनंती करत होते.
याप्रसंगी आपत्ती व्यवस्थापन ग्रुप मधील प्रवीण सुर्वे,अंकुश इचके,रेस्क्यू टीम मधील अक्षय परब,दिनेश सुतार व कर्मचारी वृंद सोबत होते.