प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : महाराष्ट्राला एक सुसंस्कृत, वैचारिक व विचारधारेला धरून राजकारण करण्याची परंपरा लाभली होती. राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीमुळे पाहता राजकारणातील 'विचारधारे'ची संकल्पना संपुष्टात येऊन फक्त आणि फक्त सत्ता हस्तगत करण्यापुरतंच राजकारण उरलं आहे हे आता स्पष्ट झालं आहे. सत्तेच्या हव्यासापोटी विचारधारेच्या राजकारणाला प्रस्थापित राजकारण्यांनी तिलांजली दिल्याची टीका आम आदमी पार्टीने ने केली आहे.
ईडी-सीबीआयच्या माध्यमातून देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास देण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने सुरु ठेवले आहे. यंत्रणांचा वापर करत विरोधी पक्षांना संपवण्याचे काम भाजप करत आहे.
एकीकडे या यंत्रणांच्या तपासाला सक्षमपणे सामोरे जात आपचे नेते माजी मंत्री मनीष सिसोदिया व सत्येंद्र जैन आजही न्यायलयीन लढाई लढत तुरुंगात आहेत. दुसरीकडे या यंत्रणांच्या दबावाखाली येत भाजप सोबत जाण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली आहे. अगदी दोनच दिवसांपूर्वी ज्या राष्ट्रवादीला पंतप्रधान मोदी यांनी जाहीर सभेतून सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्यात सामील असल्याची टीका केली, त्याच पक्षाला सत्तेत सामील करून घेतले.
जिल्ह्याचे नेते आ. हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने धाडी टाकल्या. मागील आठवड्यात झालेल्या शिव-शाहू सद्भवना यात्रेत पुरोगामी चळवळीसाठी काम करणारे मुश्रीफ ईडी चौकशीच्या दबावाला बळी पडून भाजप सोबत सत्तेत सामील होत विचारधारेला तिलांजली दिली अशी टीका आप कार्याध्यक्ष संदीप देसाई यांनी पत्रकार परिषद केली.
या सर्व घडामोडी पाहता, राज्यातील प्रस्थापितांना जनतेच्या प्रश्नांशी काहीएक देणे-घेणे नाही हे स्पष्ट होते. शेतकऱ्यांच्या मालाला भाव, महागाई, बेरोजगारी हे प्रश्न मागे पडत असून, सुसंस्कृत, वैचारिक आणि विचारधारेला संपुष्टात आणणारे राजकारण महाराष्ट्रात होत आहे.
या राजकारणाला बगल देत आप ने आपले वेगळेपण दाखवले आहे. जनतेच्या प्रश्नांवर राजकारण करत, त्यांच्या हिताची धोरणे राबवत शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी या मूलभूत गरजावर काम करत राजकारणाला एक नवी दिशा दिली आहे. अशाच पद्धतीचे काम राज्यात करून, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांशी इमान राखून आप येथून पुढची वाटचाल करणार असल्याचे आप चे कार्याध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.
यावेळी उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, अमरजा पाटील, मोईन मोकाशी, दुष्यन्त माने, विजय हेगडे, शशांक लोखंडे, समीर लतीफ, प्रथमेश सूर्यवंशी, अमरसिंह दळवी, संजय नलवडे आदी उपस्थित होते.