प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रतिनिधी :
संस्कृतीचे वहन करत असताना सद्सदविवेक बुद्धी अतिशय आवश्यक असते. चुकीच्या परंपरांनी निर्माण केलेले भेद फेटाळून लावले पाहिजेत. मानवतेचे दर्शन घडण्यासाठी स्त्रीत्वाची जडणघडण व जपणूक करताना चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसला पाहिजे. मनुस्मृतीसह अनेक ग्रंथांनी स्त्रीला स्वातंत्र्य नाकारले. पण आपण जोतिबा आणि सावित्रीच्या लेकी म्हणून सत्य धर्माची जोपासना केली पाहिजे. ग्रंथप्रामाण्य किंवा अक्षरापलीकडचे शहाणपण स्वतःच्या शोधातूनच येत असते असे मत स्त्रीवादी चळवळीच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. भारती पाटील यांनी व्यक्त केले.
इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने आणि श्रीमती आ.रा. पाटील कन्या महाविद्यालयाच्या महिला सक्षमीकरण विभागाच्या सहकार्याने कालवश उषाताई पत्की स्मृतीजागर कार्यक्रमात ' शोध स्वतःचा'या विषयावर प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ.त्रिशला कदम होत्या. ज्येष्ठ विचारवंत लेखिका प्रा. डॉ.तारा भवाळकर आणि ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ.अविनाश सप्रे हे प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी रोपट्याला पाणी घालून आणि कालवश उषाताई पत्की यांना अभिवादन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक प्रसाद कुलकर्णी यांनी केले. त्यातून कालवश उषाताई पत्की यांच्या कौटुंबिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या प्रगल्भ असलेल्या व्यक्तित्वाचा परिचय करून दिला.
प्रा. डॉ.भारती पाटील म्हणाल्या, स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर मानसिक दृष्ट्या कणखर असण्याची गरज आहे. हा कणखरपणा भवतालाकडे पाहण्याची आपली दृष्टी समृद्ध करतो. स्वतःचा शोध घेण्याच्या प्रक्रियेत विवेकवादाचे वैचारिक अधिष्ठान महत्त्वाचे असते. कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता समतल पद्धतीने आपले विचारविश्व विद्यार्थिनींनी समृद्ध केले पाहिजे. प्रा. डॉ. भारती पाटील यांनी विद्यार्थिनींना बोलते करत ' शोध स्वतःचा ' या विषयाची विस्तृत मांडणी केली. प्रा. डॉ. तारा भवाळकर आणि प्रा. डॉ. अविनाश सप्रे यांनीही यावेळी विद्यार्थिनींशी संवाद साधला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्या डॉ.त्रिशला कदम म्हणाल्या, विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्वतःची नेमकीओळख पटण्यासाठी कन्या महाविद्यालय सातत्याने कार्यरत असते. महाविद्यालयाच्या वतीने सातत्याने विविध उपक्रम आयोजित केले जातात. त्यातून विद्यार्थिनींना स्वतःची जडणघडण करण्यास मदत होत असते. त्यामुळे अशा उपक्रमांचा विद्यार्थिनींनी अधिकाधिक लाभ घेतला पाहिजे.यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव आणि महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "गांधी विचार संस्कार परीक्षेतील यशस्विनींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यामध्ये कु. हर्षदा हणमंत कांबळे या विद्यार्थिनीने प्रथम वर्ष विभागात कोल्हापूर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच कु. निकीता लक्ष्मण पाटणकर या विद्यार्थिनीने तृतीय वर्ष विभागात कोल्हापूर जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. राज्यशास्त्र विभागप्रमुख श्रीमती वर्षा पोतदार या परीक्षा समन्वयक होत्या. तर डॉ मिनाक्षी मिणचे व डॉ मोहन कांबळे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास प्रा. डॉ.प्रतिमा सप्रे,सौदामिनी कुलकर्णी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रा.डॉ. प्रमिला सुर्वे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. डॉ.प्रतिभा पैलवान यांनी केले.