प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रतिनिधी :
जिद्द , चिकाटी व प्रयत्नातील सातत्याच्या जोरावर रेंदाळच्या कन्या व ग्रामपंचायतच्या विद्यमान आरोग्य सभापती कु. रोशनबी दिलावर माणकापूरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतून टँक्स असिस्टंट पदाच्या यशाला गवसणी घातली आहे. तसेच डब्ल्यू. एस. महिला या वर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.या यशाने त्यांचे शासकीय नोकरीतून जनतेची सेवा करण्याचे स्वप्न साकारले आहे.त्यांच्या या यशाने रेंदाळ गावच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांच्या यशाचे सर्व स्तरातून मोठे कौतुक होत आहे.
रेंदाळ गावच्या कन्या कु. रोशनबी माणकापूरे या सध्या ग्रामपंचायतच्या आरोग्य सभापती पदावर कार्यरत असून गावातील ग्रामस्थांच्या आरोग्य समस्या सोडवण्याबरोबरच मुलभूत नागरी सुविधा पुरवण्यावर विशेष भर दिला आहे. मुळातच त्यांना समाजसेवेची आवड आहे.त्यामुळे प्रशासकीय सेवेत अधिकारी बनून त्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे स्वप्न त्यांनी अगदी महाविद्यालयीन काळातच उराशी बाळगले होते.त्यांची घरची परिस्थिती तशी बेताचीच आहे.त्यांचे वडील यंञमागावर कामगार म्हणून काम करतात. तर आई १० वी पर्यंतचे शिक्षण घेऊन त्या ग्रामपंचायत आरोग्य विभागाच्या माध्यमातून आशा सेविकेचे काम करून आपला संसार चालवून मुला - मुलींचे चांगले शिक्षण करत आहेत.
कु.रोशनबी माणकापूरे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उर्दु स्कूल व ज्युनिअर रेंदाळ येथे तर पदवीचे शिक्षण दत्ताजीराव कदम आटर्स ,सायन्स व कॉमर्स कॉलेज इचलकरंजी येथे बीएससीपर्यंत पूर्ण केले. खरंतर , त्यांच्या आई - वडीलांचे स्वप्न होते की , माझी मुलगी सरकारी अधिकारी व्हावी. तेच स्वप्न त्यांनीही आपले स्वप्न बनवून मोठ्या जिद्दीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला .याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरला अभ्यासिका चालू केली. या काळात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. त्यामुळेच त्यांना अपेक्षित पोस्ट मिळवायला तब्बल ४ वर्षे वाट बघावी लागली.पण , जराही हार न मानता त्यांनी मोठ्या जिद्दीने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरूवात केली.या काळात खूप मेहनत करत अभ्यासात सातत्य ठेवल्याने त्यांची २०२३ मध्ये टँक्स असिस्टंट या पदासाठी निवड झाली आहे .महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतून टँक्स असिस्टंट पदाच्या यशाला त्यांनी गवसणी घातली आहे.तसेच इ. डब्ल्यू. एस. महिला या वर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशावरच समाधान न मानता त्यांचे आता क्लास वन अधिकारी बनण्याचे स्वप्न असून त्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न सुरु ठेवले आहेत.
एकीकडे रेंदाळ ग्रामपंचायतच्या आरोग्य सभापती पदावर कार्यरत राहून त्यांनी जनसेवेचे कार्य सुरु ठेवले असून आता त्या आता टँक्स असिस्टंट परीक्षेत यशस्वी बनून पुन्हा चांगल्या पध्दतीने जनसेवा करण्यास सक्षम ठरल्या आहेत.त्यांच्या यशस्वी धडपडीचे सर्व स्तरातून मोठे कौतुक आहे.