प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : 'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत संपूर्ण देशात विविध उपक्रमांचे आयोजन करणेत येते. या उपक्रमात सिटीझन फीडबॅक या उपक्रमा अंतर्गत शहरातील नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग होण्याकरिता शहरातील माध्यमिक व प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांसोबत बैठक आयोजित करण्यात आली. जेणेकरुन शालेय विद्यार्थ्यांच्या मार्फत त्यांच्या पालकांची जनजागृती मोठ्या प्रमाणावर होवू शकते.स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत शहरातील नागरिकांचा जास्तीत जास्त सक्रिय सहभाग नोंदविणे आवश्यक असते.
यासंदर्भात ४ विविध प्रकारे सिटीझन फीडबॅक करता येतो. सदर बैठकीत फिडबॅक करणेबाबत मार्गदर्शन करणेत आले. यामध्ये प्रामुख्याने दोन वेबसाईट व दोन अँड्रॉइड ॲप वरून फीडबॅक देऊ शकतो. सिटीझन फीडबॅक संदर्भात इचलकरंजी महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल साइटवर विस्तृतपणे माहिती सादर केली आहे . त्याचबरोबर सदर बैठकीत महत्त्वपूर्ण अशा 'माझी वसुंधरा अभियान ४.०' या उपक्रमा अंतर्गत सर्व खाजगी व महानगर पालिकेच्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत व शिक्षकांमार्फत केलेल्या पर्यावरण पूरक उपक्रमांचे आयोजन करुन त्यांची चलचित्रे व छायाचित्रे सोशल मीडियावर प्रदर्शित करून सक्रिय राहण्याचे आवाहन महानगर पालिकेचे उपायुक्त तैमूर मुलाणी यांचे कडून करण्यात आले.
या बैठकीस महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी नम्रता गुरसाळे, शहर समन्वयक प्रवीण बोंगाळे यांचेसह शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.