प्रा. डॉ.तारा भवाळकर यांचे मत
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.९, अन्न हे पोटाची भूक भागवते त्या पद्धतीने वाचन डोक्याची भूक भागवत असते. साक्षरतेकडून शहाणपणाकडचा प्रवास हा वाचनामुळेच संपन्न करता येतो.आत्मचरित्रांपासून प्रवासवर्णनापर्यंत आणि कादंबरीपासून नाटकांपर्यंतचे चौफेर वाचन जग समजून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते.
वाचन आपल्या जीवन जाणिवा समृद्ध करत असते.त्यामुळे परिपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी वाचनाची सवय लावून घेणे हे अतिशय महत्त्वाची बाब आहे ,असे मत लोकसाहित्य व नाट्यशास्त्राच्या व्यासंगी अभ्यासक व मराठी साहित्यातील नामवंत संशोधक लेखिका प्रा. डॉ .तारा भवाळकर यांनी व्यक्त केले. त्या समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयात वाचन दिवस कार्यक्रमात बोलत होत्या.यावेळी मराठीतील नामवंत समीक्षक प्रा. डॉ .अविनाश सप्रे,प्रा.डॉ. प्रतिमा सप्रे, गांधी विचारांच्या नामवंत अभ्यासक व समाजवादी प्रबोधिनीच्या उपाध्यक्षा प्रा. डॉ. भारती पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रस्ताविक केले.
केरळमधील ग्रंथालय व साक्षरता चळवळीचे जनक पी.एन. पणीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिवस वाचन दिवस,सप्ताह,महिना संपूर्ण भारतात साजरा केला जातो. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१७ साली त्याचा शुभारंभ करण्यात आला होता. या वर्षीच्या या दिनाला मराठीतील ख्यातनाम साहित्यिक कालवश जी. ए .कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी दिनाचेही औचित्य होते.राजा राम मोहन रॉय प्रतिष्ठान (कलकत्ता), ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य (मुंबई )आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी (कोल्हापूर )यांच्या मार्गदर्शनाखाली हा वाचन दिन सर्वत्र साजरा होत आहे. यावेळी दत्तात्रय जाधव, पार्थ दिघे ,प्रणव पवार, प्रथमेश चव्हाण, मनोज तोलगेकर,नंदा हालभावी ,अश्विनी कोळी आदींसह सर्व उपस्थितांना वाचन दिवसानिमित्त वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी ग्रंथ भेट देण्यात आले. सौदामिनी कुलकर्णी यांनी आभार मानले.