ब्राम्हण सभेच्या अन्य पुरस्कारांचीही घोषणा
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी /प्रतिनिधी -
येथील सुवर्णमहोत्सवी ब्राह्मण सभा इचलकरंजी यांचे तर्फे प्रतिवर्षी 1 ऑगस्ट रोजी दिला जाणारा मानाचा ’लोकमान्य टिळक पुरस्कार’ यावर्षी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल विनायक विठ्ठल गद्रे यांना जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर सौ. सायली कुलकर्णी-सांभारे (कला), डॉ. राहुल प्रकाश कुलकर्णी (क्रीडा), डॉ. अरविंद बळवंत कुलकर्णी (वैद्यकीय), अमोद महेश्वर ठाकूरदेसाई (खाद्य व्यवसाय) यांना ‘श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकार’ या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तसेच वेदसम्राट कै. सखाराम पाध्ये गुरुजी यांचे स्मरणार्थ ’वेदोनारायण पुरस्कार’ वेदमूर्ती मंदार महेश पुजारी (नृसिंहवाडी) यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती ब्राह्मण समेचे अध्यक्ष सुरेश उर्फ बंडा जोशी यांनी दिली.
येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे मंगळवार 1 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 5:30 वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथि म्हणून महाराष्ट्राचे हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे (सोलापूर) उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ समाजसेवक देवदत राजोपाध्ये (विटा) हे भूषविणार आहेत. यावेळी इचलकरंजी चे अधिपति श्रीमंत यशवंतराव गोविंदराव घोरपडे (सरकार) यांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर समाजातील इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वी मध्ये 80 टक्के गुण प्राप्त विद्यार्थी तसेच इयत्ता 5 वी व 8 वी एनएमएमएस व एनटीएस, एमटीएस, नेट-सेट, युपीएससी, स्कॉलरशिप तसेच कला, क्रीडा, आरोग्य व आध्यात्मिक, योग क्षेत्रात राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर विशेष पुरस्कार मिळवलेल्या गुणीजनांचा गौरव करण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थी-विद्यार्थ्यांनींना गुणपत्रिका व योग्य प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रतिसह 27 जुलै 2023 अखेर ब्राह्मण सभा कार्यालय झेंडा चौक येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधून नांवे नोंदवावीत, असे आवाहन ब्राह्मण सभेतर्फे करण्यात आले आहे. याप्रसंगी ब्राह्मण सभेचे विश्वस्त, कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.