प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.१०,गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणा मध्ये येनकेन प्रकारेण सत्ताकारण सुरू आहे.विरोधी पक्ष केवळ फोडण्यापासून नव्हे तर तो अख्खा गिळंकृत करण्यापर्यंतचे उद्योग विकासाला साथ देण्याच्या नावाने सुरू आहेत. पण विकास तर बेपत्ता आहे.हे सारे संसदीय लोकशाही व्यवस्थेसाठी अतिशय घातक असे आहे. लोक आपला मताधिकार न बजवण्याचा किंवा नोटा हा पर्याय स्वीकारण्याचा मोठ्या प्रमाणात विचार करत आहेत. या साऱ्या प्रकारामुळे लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास कमकुवत होत आहे. अशावेळी सजग कार्यकर्त्यांनी आपल्या सद्सद विवेक बुद्धीला स्मरून कार्यरत राहण्याची गरज आहे.
राजकारणाचे सत्ताकारण करणाऱ्यांना, लोकशाही खिळखिळी करणाऱ्यांना, आणि लोकांच्या मताच्या अधिकाराला काहीही किंमत न देणाऱ्याना मताच्या आधारेच पराभूत करून लोकशाही बद्दलचा विश्वास रुजवावा लागेल.असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिकं चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. ' राजकारणाचे सत्ताकारण ' हा या चर्चासत्राचा विषय होता.या वेळी प्रसाद कुलकर्णी,शशांक बावचकर,प्रा.रमेश लवटे,दयानंद लिपारे, तुकाराम अपराध,देवदत्त कुंभार,अशोक केसरकर,अप्पा पाटील,श्रेयस लिपारे, सचिन पाटोळे ,रामभाऊ ठीकणे , डी.एस. डोणे ,नारायण लोटके आदींनी या चर्चेत सहभाग घेतला.
या चर्चेमधून पक्षीय फोडाफोडीचे वाढते प्रकार ,स्वतंत्र स्वायत्त केंद्रीय संस्थांचा कुटीलनीतीने होणारा वापर, प्रादेशिक पक्ष व अस्मिता यांचे शिरकाण,भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि त्यांना पक्षप्रवेश देऊन पावन करायचे, निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करून उपऱ्याना मोठे करायचे, एकपक्षीय राजवट आणण्यासाठी सर्व घटनात्मक मूल्ये पायदळी तुडवायची, आत्मनिर्भरतेपासून कर्तव्य पथापर्यंतच्या विविध शब्दांचा वापर करून त्याच्या विरोधी वर्तन व्यवहार करायचा आदी अनेक मुद्द्यांवर मते व्यक्त करण्यात आली. आणि या साऱ्यातून भारतीय राज्यघटना आणि तिचे तत्त्वज्ञान या मूल्यांचा प्रसार आणि प्रचार करणे व त्या आधारित लोकमत संघटित करणे हे सजग भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. ते त्यांनी बजावले पाहिजे असा आशय व्यक्त झाला.यावेळी
पांडुरंग पिसे,राजन मुठाणे, बि.जी.देशमुख ,अशोक मगदूम,मनोहर जोशी,शहाजी धस्ते, आनंद जाधव आदी उपस्थित होते.