प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)
५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट
समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी
ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर
पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)
prasad.kulkarni65@gmail.com
सोमवार ता. १० जुलै २०२३ रोजी मराठी साहित्यातील एक श्रेष्ठ कथाकार कालवश जी.ए .कुलकर्णी उर्फ गुरुनाथ आबाजी कुलकर्णी यांची जन्मशताब्दी आहे. १० जुलै १९२३ रोजी जन्मलेले जी. ए. कुलकर्णी ११ डिसेंबर १९८७ रोजी कालवश झाले. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील एकसंबा या गावी त्यांचा जन्म झाला. तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. बेळगाव येथे त्यांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण झाले. १९४६ साली त्यांनी इंग्रजी विषयात एम. ए.पदवी प्राप्त केली. त्यांनी काही काळ मुंबईमध्ये सरकारी नोकरी गेली. नंतर धारवाडच्या जनता महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून नोकरीस लागले व तेथेच निवृत्त झाले. अखेरचा काही काळ ते पुण्यात वास्तव्य करीत होते.जी. ए. कुलकर्णी यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी कथालेखन सुरू केले होते. १९४० च्या आसपास चित्रा, विविधवृत्त, धनुर्धारी,चित्रमय जगत इत्यादी नियतकालिकात त्यांच्या काही कथा प्रकाशित झालेल्या आहेत.तर १९४२ पासून सत्यकथेमध्ये ते लिहू लागले. तसेच मौज, नवयुग ,अभिरुची ,हंस, मनोहर, वाङ्मयशोभा आदी मधूनही ते सतत लिहीत असत.
त्यांचा पहिला कथासंग्रह निळासावळा (१९५९) प्रकाशित झाल्यावर यांच्या कथेचे सामर्थ्य दिसून आले. ते म्हणजे कथेच्या अंतःस्वरूपात बदल घडवून आणण्याचे तिचे वेगळेपण. त्यानंतर पारवा (१९६०), हिरवे रावे (१९६२), रक्तचंदन (१९६६) आणि काजळमाया (१९७२), रमलखुणा (१९७५), सांजशकुन ( १९७५), पिंगळा वेळ (१९७७)असे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. कुसुमगुंजा (१९८९)आकाशफुले (१९९०), सोनपावले (१९९१) हे संग्रह त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. माणसे अरभाट आणि चिल्लर हे आत्मदिवेदनात्मक पुस्तकही त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. तसेच रान,गाव,शिवार (१९६७), रानातील प्रकाश ( १९६८) स्वातंत्र्य आले घरा(१९६८), वैऱ्याची एक रात्र (१९८२), एक अरबी कहाणी (१९८३), लॉर्ड ऑफ द फ्लाईस(१९८७) इत्यादी अनुवादित पुस्तकेही प्रकाशित झाली. जी. ए. कुलकर्णी यांनी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असे बालसाहित्यही लिहिले. ओंजळधारा (१९८१) अमृतफळे, बखर बीम्मची (१९८६), मुग्धाची रंगीत गोष्ट (१९८६) ही त्यांची बार व कुमार वाचकांसाठी लिहिलेली पुस्तके अतिशय महत्त्वाची आहेत.
जी.ए. अलौकिक प्रतिभेचे लेखक होते.जवळजवळ पन्नास वर्षे ते सतत लिहित राहिले. रसिकांना त्यांच्या लेखणीने नेहमीच मोहिनी घातली. आजही त्यांचे साहित्य मोठ्या आवडीने वाचले जाते. त्यानी रूपककथा या प्रकाराला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली. मानवी नातेसंबंध ,मानवी दुःख ,मानवी आगतिकता, मानवी भावभावना या साऱ्याचे अनेक पदर यांच्यासाठी इत्यादी दिसून येतात. मानवी जीवनाबद्दलचा व्यापक आणि सखोल आशय त्यांच्या साहित्यातून दिसून येतो. जी.ए.यांचे साहित्य पुन्हा पुन्हा वाचावे असे आहे.
त्यांच्या साहित्याविषयी डॉ.भालचंद्र फडके म्हणतात, 'जी. ए. यांना कथा हा साहित्यप्रकार आव्हान देणारा म्हणून प्रिय वाटतो. त्यांचे कथालेखन हा त्यांच्यापुरता एक शोध आहे. प्रसिद्ध रशियन कादंबरीकार डॉस्टोव्हस्कीप्रमाणे त्यांना मानवी जीवनाच्या अंतिम वास्तवाविषयी चिंतन करणे आवडते. ‘माणूस नावाचा बेटा’, ‘राधी’,‘पराभव’, ‘गुंतवळ’, ‘प्रदक्षिणा’ यांसारख्या कथा एखाद्या दाट जंगलासारख्या असून त्या वाचकाला पार गुंतवून टाकतात, झपाटून टाकतात. अर्थहीन जगात माणूस किती केविलवाणा ठरतो, हे जसे त्यांच्या कथा वाचीत असताना ध्यानात येते तसे जीविताच्या रखरखीत वाळवंटात प्रवास करणारी माणसे मायेच्या नाजूक धाग्यांनी बांधलेली असतात, हेही ध्यानात येते. जी. ए. हे चार भिंतींतील माणसांची कथा काव्यात्म शैलीने सांगतात आणि माणसामाणसांमधील भावबंधनाचे व त्यांना अगतिक, नगण्य बनवणाऱ्या नियतीच्या असीम शक्तीचे दर्शन घडवितात. ठिपका, विदूषक, दूत इ. रूपककथांचे रूप वेगळे. त्या मनाचा पिच्छा पुरविणाऱ्या दुःस्वप्नासारख्या वा अतिवास्तववादी चित्रासारख्या वाटतात. त्यांतून ते जन्ममृत्यू, नियतीचे सामर्थ्य, माणसाची जीवनेच्छा व या सर्वांतून जाणवणारे जीविताचे गूढ यांचे भेदक विश्लेषण करतात. त्यांना मानवी दुःख आणि मानवाची असत्प्रवृत्ती यांतून एक प्रकारची उग्रता व दाहकता जाणवते. त्यांचा जिवंत अनुभव त्यांच्या कथेतून उमलतो. त्यांच्या चांगल्या कथा लेण्यातील शिल्पासारख्या भव्य वाटतात. १९४५ नंतर उदयास आलेल्या मराठी नवकथेचा पुढचा एक विकसित टप्पा त्यांच्या कथासाहित्याने गाठला आहे. '
मराठी वाङ्मयकोशात यांच्या कथेबद्दल म्हटले आहे, माणसाच्या वाट्याला येणारे दुःख, अपयश, माणसा माणसामधील संबंधांमध्ये ताण निर्माण करणारे मानवी विकार आणि संपूर्ण मानवी जीवनावर असलेल्या अतर्क्य नीतीची सावली ,जीवनातील असंगती, अर्थशून्यता यांचा व्यापक सर्वंकष प्रत्यय देणारी जी.एं.ची कथा त्यांच्या शोकात्म जीवनदृष्टीचा प्रत्यय देते .जी. एं. नी परंपरागत कथा स्वरूपाचा स्वीकार केला. त्यांच्या कथेत कथानक, घटना,पात्रे, निवेदन, संवाद हे घटक पूर्ण रूपाने अस्तित्वात असतात .पारंपारिक कथेचे बोधकथा, नीतिकथा, रूपककथा, प्राणी कथा, दृष्टांत कथा असे प्रकारही त्यांनी स्वीकारले. परंतु त्यांच्या कथेने आधुनिक जाणीवला वेधून असणारे जीवनाची अर्थरहितता, असंबद्धता आणि त्यातील कार्यकारणहीनता हे कुंठीत करणारे पेच, मानवी मूल प्रेरणांची व्याप्ती,या गोष्टी व्यक्त केल्या.त्यांची कथा तरल आणि उत्कट भावानुभव व्यक्त करणारी , संवेदना धिष्टित प्रतिमांमधून अफाट विश्वाचे ,तृष्णेचे , वासनांचे त्याचबरोबर गुंतागुंतीच्या मानवी भावनांचे ,मृत्यूच्या प्रखर अपरिहार्यतेचे आणि भयाकुल वास्तवाचे पिळवटून टाकणारे दर्शन घडवणारी आहे.'
जी. ए.कुलकर्णी यांच्या पहिल्या चार कथासंग्रहातील निवडक कथांचा संग्रह डोह काळीमा या नावाने प्रकाशित झाला.त्याला नामवंत समीक्षक व अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष म. द. हातकणंगलेकर यांची चाळीस पानी दीर्घ प्रस्तावना आहे.त्यात त्यांनी जी. ए.आणि त्यांचे कथालेखन याबाबत जे लिहिले आहे ते
प्रत्येक साहित्य रसिकाने वाचलं पाहिजे.जी. ए.यांची उंची,खोली समजण्यासाठी ते उपयुक्त आहे.ते लिहितात, व्रतस्थतेची बैठक ही गंभीर मनोधरणेची असते.ही धारणा जीवनविषयक व कलाविषयक असू शकते.या दोन्ही धारणा कलावंताच्या ठिकाणी एकत्र नांदताना आढळतील असे नाही.जी. एं. च्या ठिकाणी त्या एकत्र नांदताना आढळतात.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासून कार्यकर्ते आहेत.तसेच गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)