लाल रेघेमागची संवेदनशीलता आणि बायोमेट्रिकचे राजकारण....



प्रेस मीडिया लाईव्ह : 

डॉ. तुषार निकाळजे 

परवाची गोष्ट मुसळधार पाऊस पडत होता. कार्यालयांमध्ये सकाळची येण्याची गडबड चालू होती. त्या कार्यालयातील एका महिला अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये एक महिला कर्मचारी त्या महिला अधिकाऱ्यास गयावया करीत होती ,"अहो मॅडम, मला १० मिनिटे उशीर झाला म्हणून तुम्ही हजेरी पत्रकावर लाल रेघ मारली . अहो आपल्या शहरात गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे, ट्राफिकची समस्या आहे, आपल्या शहरात मेट्रो रेल्वेची देखील कामे चालू आहेत, त्या मध्ये पाऊस पडला, मी मुख्य गेटवरून आत येताना हात ओले असल्याने व सकाळी घरकाम केल्याने बायोमेट्रिक होत नव्हते, त्यामुळे दरवाजा उघडला जात नव्हता. तेथेच चार ते पाच मिनिटे गेली. तसेच आपल्या विभागातील बायोमेट्रिक करताना हात ओले व घर कामामुळे खरखरीत झाले असल्याने दोन मिनिटे व्हाय  बायोमेट्रिक  झालेच नाही . 

सध्या आपल्या कार्यालयाच्या मुख्यद्वारा जवळचा जुना पूल पाडला असल्याने भयंकर ट्राफिक असते. रस्ता क्रॉस करण्यासाठी दोन किलोमीटरवर लांब जाऊन पुन्हा वळण घ्यावे लागते. शहरातून येणारे आपल्या कार्यालयातील कर्मचारी  टेन्शन मध्ये असतात .तुम्हाला माहीतच आहे , माझे पती बाहेर गावी नोकरी करतात . सध्या माझी मुलं शाळा व कॉलेजमध्ये जातात .त्यांचे व स्वतःचे दोन वेळचे जेवण मला तयार करावे लागते .घरी सध्या  धुने- भांडी ,स्वयंपाक, फरशी पुसण्यासाठी कामवाली येऊ शकत नाही. आता गेले तीन दिवस मुसळधार पाऊस चालू आहे. बसेसमध्ये तुंबळ गर्दी  असल्याने मी स्कूटरवरून १४  किलोमीटर अंतरापासून ऑफिसला येते.  त्यामध्ये आता आपल्या ऑफिसच्या मेनगेट समोर पूल बांधण्याचे काम चालू आहे . आज नेमकी आमच्या बिल्डिंगची लाईट गेली .तीन मजले रेनकोट,डब्याची पिशवी घेऊन पायी जिना उतरले. यामध्ये आपल ऑफिस तिसऱ्या मजल्यावर. त्याला लिफ्ट नाही. आता वय झाल्याने गेले तीन वर्षे  हा जिना चढताना दम लागतो. आता उतारवयात आणि १०  मिनिटे उशिरा आले तर माझ्या नावापुढे लाल रेघ मारली.थोडीशी तरी सहानुभूती ठेवा या काळात. बायोमेट्रिक  मशीनवर देखील उशीर दाखविला गेल्याने रजा कापल्या जातात. या सर्व प्रकरणात त्या अधिकाऱ्याने त्याचा "उशिरा आलेल्या कर्मचार्‍याच्या नावापुढे लाल रेष मारण्याचा अधिकार"  प्रामाणिकपणे बजावला  याबद्दल शंकाच नाही . 

           परंतु तत्पूर्वी इतर जबाबदाऱ्यांचा विचार केला का? हा प्रश्न उपस्थित होतो .कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्याची बातमी वर्तमानपत्र( ई-पेपर ), दूरदर्शन चॅनेल , व्हाट्सअप वरील परिपत्रकाद्वारे माहीतच असेल ,आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची येण्या - जाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून बांधकाम विभाग, नगरपालिका कार्यालयात कोणते विनंतीवजा निवेदन पत्र दिले होते का? महिला कर्मचाऱ्यांच्या  घरगुती कार्यालयीन त्रेधातिरपीटीचा विचार केला होता का? हल्लीच्या महागाईच्या युगात नवरा बायको परजिल्ह्यात नोकऱ्या कराव्या लागतात, हे माहित नाही का? करोणाच्या प्रादुर्भावामुळे हल्ली मोलकरणींना देखील बंधने आली असल्याने बऱ्याच महिला घरची सर्व कामे स्वतः करतात. पतींची परजिल्ह्यात नोकरी ,मुलांना घरांमध्ये सोडून येताना तिच्या मानसिक परिस्थितीची जाणीव या अधिकार्‍यास माहित नाही का?  कार्यालय प्रमुख कार्यालयाच्या वसाहती मधील अधिकाऱ्यांच्या बंगल्यात राहतो का?  आणि राहत असूनही तो शासनाचा पेट्रोल भत्ता घेतो का?  स्वतःच्या कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील लिफ्टच्या तरतुदी बद्दल एखादे पत्र, गार्हाणे या अधिकाऱ्याने कार्यालयाच्या मुख्य अधिकाऱ्यास सांगितले का? कर्मचारी जेवढे जास्त काम करतील तेवढा ओव्हर टाईम , पिस वर्क मिळतो . त्याचबरोबर अधिकाऱ्यांना या कर्मचाऱ्यांच्या ज्यादा कामाच्या पर्यवेक्षणासाठी वेगळा पर्यवेक्षण भत्ता मिळतो .अशा उशिरा येणाऱ्या व लाल रेषा मारलेल्या कर्मचाऱ्यांच्या लाल रेषांचा हिशोब करून या अधिकाऱ्याने स्वतःच्या पर्यवेक्षण भत्त्यात कपात करण्याचा अर्ज वित्त अधिकाऱ्याकडे दिला होता का?  या सर्व प्रश्नांचा विचार अशा लाल रेघा मारणारे अधिकारी करतात का ? एखाद्या कार्यालयाचे सर्वच कर्मचारी व अधिकाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी तपासले तर त्यातील एक गोष्ट निदर्शनास येईल कर्मचारी किंवा कामगार संघटनांचे पदाधिकारी किंवा अधिकाऱ्यांशी संपर्कात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना  वेगळी  वागणूक. मुळातच बायोमेट्रिक हजेरी प्रकार  सुरू करण्यामागचा हेतू म्हणजे कार्यालयात वेळी न येणारे किंवा हजर असूनही हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करून मोकाट फिरणाऱ्यांना हे बंधन. परंतु प्रत्येक कार्यालयात असे दहा ते वीस टक्के महाभाग सापडतील. मग  ८० ते   ९० टक्के प्रामाणिकपणे जागेवर बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हे बंधन का? १०  ते २०  टक्के कामचुकारपणा करणाऱ्यांना शिक्षा किंवा कारवाई करणे दूरच राहिले, पण त्यांना व्यवस्थितपणे क्षमापित करणे ही नित्याचीच बाब झाली आहे. याचबरोबर एखादे उदाहरण असे सापडेल की कार्यालय प्रमुखांना पदोन्नती न मिळाल्याने किंवा  पदोन्नतीचा अर्ज करूनही बाद ठरल्याने व त्यामुळे असंतुष्ट झाल्याने तो राग या बायोमेट्रिकच्या निमित्ताने बाहेर पडतो. 

             व्यवस्थापनामध्ये अधिकार व कर्तव्य या नाण्याच्या दोन बाजू असतात .या अनुषंगाने नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणे आवश्यक आहे .एका प्रसिद्ध शायरने म्हटलेच आहे,

"कुछ तो मजबूरी रही होगी शायद

युही कोई बेवफा नही होता".

Post a Comment

Previous Post Next Post