बेडकीहाळ येथे तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन मान्यवरांची उपस्थिती



प्रेस मीडिया लाईव्ह :

बेडकीहाळ. :-दूधगंगा नदीच्या काठावर वसलेले बेडकीहाळ हे गाव आर्थिकदृष्ट्या सधन म्हणून ओळखले जाते. दूधगंगा नदीचे बारमाही वाहणारे पाणी, सुपीक जमीन आणि उसासारख्या नगदी पिकाने हा परिसर सधन समजला जातो. तसेच सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि विशेष करून शैक्षणिक क्षेत्रात बेडकीहाळ अग्रेसर मानले जाते. 

बेडकीहाळ गावचे भौगोलिक स्थान पाहता बेळगाव, निपाणी, चिकोडी, कोल्हापूर, सांगली, हुपरी, इचलकरंजी अशा कर्नाटक महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना जोडणारे रस्ते आणि वाहतुकीची सोय यामुळे या परिसराचा झपाट्याने कायापालट होताना दिसतो आहे. या परिसरातील पहिले हायस्कूल 1952 साली बेडकीहाळ येथे स्थापन झाले आणि शैक्षणिक वटवृक्षाचे बीजारोपण झाले. हीच संस्था पुढे लठ्ठे शिक्षण संस्था या नावाने ओळखली जाऊ लागली आणि दळणवळणाच्या सोयीसाठी तिचे केंद्रीय कार्यालय सांगली येथे स्थापन करण्यात आले. 

आज लठ्ठे शिक्षण संस्थेच्या शाखा बेडकीहाळ येथे ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. लठ्ठे शिक्षण संस्थेमुळे बेडकीहाळचे नाव शैक्षणिक क्षेत्रात आदराने घेतले जाऊ लागले. ग्रामीण भागातील विद्यार्थी उत्कृष्ट पद्धतीने घडवण्याचे कार्य ही संस्था आणि तिच्या शाखा करू लागल्या. अशा आर्थिकदृष्ट्या सधन आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगत असलेल्या बेडकीहाळ परिसरातील साहित्यप्रेमी मंडळींना साहित्याची मेजवानी उपलब्ध करून देणारी संस्था म्हणजे कै. बसवंत नागू शिंगाडे चारिटेबल ट्रस्ट ही होय.

सामुदायिक विवाह सोहळा, गरजूंना अर्थसहाय्य, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप यासारखे सामाजिक कार्य हाती घेतलेल्या या ट्रस्टकडून बेडकीहाळ येथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येऊ लागले आणि यंदाचे हे संमेलनाचे तिसरे वर्ष आहे. येथील लठ्ठे शिक्षण संस्थेच्या बी एस संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयाच्या रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहामध्ये दिनांक 16 जुलै 2023 रविवार रोजी होणाऱ्या या तिसऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये साहित्यिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी सहभाग घेणार आहेत. बेळगाव येथील लिंगराज महाविद्यालयाच्या निवृत्त प्राध्यापिका आणि माजी मराठी विभाग प्रमुख, ज्येष्ठ निरूपणकार श्रीमती विजया धोपेश्वरकर या संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत तर कन्नडमधील ज्येष्ठ साहित्यिक, माजी संपादक, बेळगावी जिल्हा कन्नड साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ सरजू काटकर हे संमेलनाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. बेडकीहाळ गावच्या सरपंच सौ सविता पाटील या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष आहेत.उद्घाटन, व्याख्यान आणि कथाकथन अशा तीन सत्रांमध्ये चालणाऱ्या या साहित्य संमेलनास विधानपरिषद सदस्य मा प्रकाश हुक्केरी, चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा अण्णासाहेब जोले, निपाणी विधानसभा मतदार संघाच्या आमदार मा सौ शशिकला जोल्ले, चिकोडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा गणेश हुक्केरी, माजी आमदार मा काकासाहेब पाटील माजी ऊर्जामंत्री मा वीरकुमार पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, निपाणी मतदार संघाचे युवा नेते उत्तम अण्णा पाटील, बी एस संयुक्त पदवी पूर्व महाविद्यालयाचे चेअरमन मा इंद्रजीत पाटील, सरस्वती को-ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक श्री जनगोडा पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सकाळी आठ वाजता सर्कल परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील प्रसिद्ध उद्योजिका मा डॉ सुमित्रा पाटील आणि उद्योजक दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते ग्रंथ आणि पालखी पूजन होणार आहे. तर कृषीपंडित मा सुरेश देसाई यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. तर गुरुदत्त शुगर टाकळीवाडीचे संचालक मा बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते स्व. बाळासाहेब कुलकर्णी बेडकीहाळकर प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तर स्व सुलोचना लाटकर दीदी साहित्य नगरीचे उद्घाटन कंदलगाव येथील व्ही. जे. पाटील फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा वसंतराव पाटील करणार आहेत. तर माजी जिल्हा पंचायत सदस्य मा राजेंद्र वड्डर (पवार) यांच्या हस्ते स्व जी ए कुलकर्णी व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

मा आर जी डोमणे, मा मलगोडा पाटील, मा सुनील नारे, प्रा. डॉ गोपाल महामुनी, मा उदय पांगिरे, मा शितल खोत, मा अशोक झेंडे, मा सखाराम जाधव, मा प्रसिद्ध निलायज्योती, मा भारत माळगे आदी मान्यवरांच्या हस्ते विविध महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये मा श्री प्रकाश कदम, कोगनोळी यांचे आजचे शिक्षण आणि संस्कार' या विषयावर मा प्रकाश काशीद यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान होणार आहे. तर तिसऱ्या सत्रामध्ये इचलकरंजी येथील प्रसिद्ध कथाकथनकार मा कृष्णात कोरवी यांचे कथाकथन होणार असून या सत्राचे अध्यक्ष मा डॉ बाळासाहेब कर्णवर पाटील हे असणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष या. डॉ विक्रम बसवंत शिंगाडे यांनी दिली तसेच साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post