प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : भारती विद्यापीठाच्या ' भारती अभिमत विश्वविद्यालया ' ला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क’( एनआयआरएफ) क्रमवारीत ९१वे स्थान मिळाले आहे. भारती विद्यापीठ अंतर्गत ५ इन्स्टिट्यूटचा या क्रमवारीत समावेश झाला आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आय.एम.ई.डी.) ला एन.आय.आर.एफ सर्वेक्षणात देशातील सर्वोत्तम १२५ व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या क्रमवारीत ( १०१ ते १२५ या रँक बँडमध्ये) स्थान मिळाले आहे. भारती विद्यापीठाची फ़ार्मसी इन्स्टिट्यूट २९ व्या ,दंत महाविद्यालय ३९ व्या तसेच फार्मसी इन्स्टिट्यूट (कोल्हापूर) ७९ स्थानावर आहे .
' उच्चशिक्षणाला पोषक वातावरण, उत्तम शिक्षणपद्धती, उत्तम शिक्षकवर्ग व विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळेच भारती विद्यापीठा ला शिक्षणक्षेत्रात मोठे योगदान देणे शक्य झाले आहे. सर्वोत्तम प्लेसमेंट संधी, कालानुरूप आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण, उद्योजकता विकासाला वाव, विद्यार्थी केंद्रीत उपक्रम याचा फायदा झाला’ ,अशी प्रतिक्रिया भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विद्या शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडी चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी आमच्या प्रतिनिधीने विचारली असताना व्यक्त केली.संस्थापक स्व.डॉ.पतंगराव कदम यांची प्रेरणा तसेच कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ.विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ.विवेक सावजी यांच्या पाठिंब्यामुळे व त्यांच्या प्रोत्साहनामुळे भारती विद्यापीठाने हे यश मिळविले आहे.
दरवर्षी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे देशातील प्रमुख विद्यापीठासह दहा वेगवेगळ्या प्रवर्गातील महाविद्यालयांची क्रमवारी मानांकन जाहीर केले जाते. यंदा केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री राजकुम कुमार रंजन सिंह यांनी ५ जून रोजी क्रमवारी मानांकन जाहीर केली.