प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करुन त्यावरील बातमीपत्रांचे छत्रपति संभाजीनगरला स्थलांतर करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेऊन पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाला नष्ट करण्याचे धोरण आखले आहे असे दिसून येत आहे. अशा वेळी माजी केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री असणारे ‘पुणेकर’ प्रकाश जावडेकर यांना पुण्याबद्दल आकस नसेल तर किमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे प्रयत्न करून हा निर्णय रद्द होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. जर हा निर्णय केंद्र शासनाने रद्द केला नाही तर कॉंग्रेस पक्षातर्फे तीव्र निदर्शने केली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा पुण्याबद्दलचा आकस स्पष्टपणे दिसून येत असल्यामुळे पुणेकरांनी आता संघटित होऊन भाजपचा हा डाव हाणून पाडला पाहिजे. तसेच शिवाजीनगर येथे भव्य मेट्रो स्टेशन होत असल्यामुळे पुणे आकाशवाणीच्या सुमारे ४ एकर जागेवर बिल्डरच्या फायद्यासाठी व्यापारी संकुल होण्यासही विरोध केला पाहिजे असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी म्हंटले आहे.
मोहन जोशी पुढे म्हणाले की, ‘पुणेकर’ प्रकाश जावडेकर केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री असतानाच त्यांनी घेतलेल्या केंद्र धार्जिण्या निर्णयामुळे पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची स्वायत्तता गेली. पुणे आकाशवाणीचे प्रादेशिक वृत्ताचे केंद्र गेले. पुणे दूरदर्शनची देखील त्यांनी दुरावस्था करून टाकली. केवळ राज्याचेच नव्हे तर देशाची सांस्कृतिक राजधानी असा पुण्याचा नावलौकिक कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातबद्दल प्रेम आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरबद्दल प्रेम आहे अशावेळी ‘पुणेकर’ प्रकाश जावडेकरांना पुण्याबद्दल प्रेम आहे काय? असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत. पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाला नख लावणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारला साथ देऊन ‘पुणेकर’ प्रकाश जावडेकर यांनी कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यी मर्जी संपादन केलीही असेल मात्र पुणेकर आता त्यांच्या पुणे विरोधी कटकारस्थानांना क्षमा करणार नाहीत. आता तरी याचे प्रायश्चित्त म्हणून ‘पुणेकर’ प्रकाश जावडेकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे रदबदली करून पुणे आकाशवाणी केंद्राबद्दलचा निर्णय मागे घेण्यास त्यांना भाग पाडावे. कॉंग्रेस पक्ष पुणेकरांचे हित सांभाळण्यासाठी या निर्णयाविरुद्ध जोरदार आंदोलन करेल असा इशारा मोहन जोशी यांनी दिला.
मोहन जोशी
उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
९८२२०९६७२०