वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशनच्या सल्लागार मंडळाच्या सदस्यपदी रोहन मोरेची निवड



प्रेस मीडिया लाईव्ह :

तेनसिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारविजेता तसेच राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कारविजेता पुण्याचा सागरी जलतरणपटू रोहन मोरे याची वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशनच्या (डब्ल्यूओडब्ल्यूएसए) सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून नुकतीच निवड करण्यात आली. 

वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशनच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी क्विन फिट्झगेराल्ड यांनी नुकतीच याची घोषणा केली. या संघटनेने आपल्या तीन मंडळांवर रोहनची नियुक्ती केली आहे. ही निवड पाच वर्षांसाठी असेल. त्याचा डब्ल्यूओडब्ल्यूएसएच्या नियम समिती, प्रशिक्षण आणि शिक्षण समिती तसेच पर्यावरण समितीत समावेश करण्यात आला आहे. यावेळी अशी संधी मिळालेला तो एकमेव भारतीय आहे.

३५ वर्षीय रोहन हा सात महासागर पोहून जाणारा जगातील केवळ नववा तर आशियातील पहिलाच जलतरणपटू ठरला आहे. डब्ल्यूओडब्ल्यूएसएने आपल्या सल्लागार मंडळात त्याचे स्वागत केले. "सुरक्षितता, पर्यावरणीय कारभारीपणा आणि शैक्षणिक वाढीवर लक्ष केंद्रित करण्याचे आमचे ध्येय आहे. तुमची अद्वितीय कौशल्ये आणि दृष्टीकोन वर उल्लेख केलेल्या क्षेत्रातील प्रगती आणि परिवर्तनासाठी सहाय्यक ठरतील, असे डब्ल्यूओडब्ल्यूएसएचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्विन फिट्झगेराल्ड यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

रोहनला अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत. २०१६ मध्ये केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाने तेनसिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला. २०१८ मध्ये रोहनचा 'इंटरनॅशनल मॅरेथॉन स्विमिंग हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश करण्यात आला.  'वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशन'ने २०१६ मध्ये त्याचा जगातील ५० साहसी जलतरणपटूंमध्ये समावेश केला आहे. याबरोबरच 'वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशन'च्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या 'वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग मॅन ऑफ द इयर' या पुरस्कारासाठी रोहनला तीनदा नामांकित करण्यात आले होते.


रोहन मोरे  -  9075748911                                                                                                                                       प्रवीण वाळिंबे - ९८२२४५४२३४ , ७३८७००२०९७

Post a Comment

Previous Post Next Post