दि. २७ जून रोजी उत्तरा केळकर यांना प्रदान होणार
प्रेस मीडिया लाईव्ह :
ज्येष्ठ संगीतकार कै. श्रीकांत ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त मंगळवार २७ जून रोजी सायंकाळी ५.०० वाजता ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना ‘श्रीकांत ठाकरे संगीत’ पुरस्कार समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार आनंद माडगुळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. यावेळी कै. श्रीकांत ठाकरे यांनी संगीत दिलेल्या गाण्यांवर आधारित ‘स्वरराज’ हा विशेष गाण्यांचा कार्यक्रम सादर केला जाईल. त्यामध्ये गप्पागोष्टी आणि आठवणींना उजाळा देखील देण्यात येईल अशी माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस व महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेचे अध्यक्ष हेमंत संभूस, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन आणि संयोजक योगेश राजापूरकर व निकिता मोघे यांनी दिली.
हा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संवाद पुणे आणि स्वयंभू प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला असून याची संकल्पना सुनील महाजन यांची आहे. ‘स्वरराज’ या कार्यक्रमात संगीतकार कै. श्रीकांत ठाकरे यांनी संगीत दिलेली गीते पार्श्वगायक रश्मी मोघे, धनश्री गणात्रा, अजित विसपुते आणि सारंग कुलकर्णी सादर करणार असून अमृता ठाकूरदेसाई, केदार परांजपे, नितीन शिंदे, अपूर्व द्रविड आणि अभय इंगळे हे वाद्यसंगत करतील. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर (मुंबई) हे कै. श्रीकांत ठाकरे यांच्या संगीत विषयक आठवणींना उजाळा देतील. या सर्व कार्यक्रमाचे निवेदन ज्येष्ठ निवेदिका स्नेहल दामले करणार आहेत.
सुनील महाजन
संवाद पुणे
९३७१०१०४३२