नगरविकास विभागाकडून अहवाल मिळताच निर्णय घेण्यात येईल... महापालिका आयुक्त विक्रम कुमार.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : गेल्या चार दिवसांपासून महापालिकेसमोर आमरण उपोषणासाठी बसलेल्या रजा मुदतीवरील शिक्षकांची दखल अखेर प्रशासनाने घेतली. मानधनवाढ मिळावी आणि न्यायालयाच्या आदेशानुसार कायम सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांसोबत झालेल्या चर्चेमध्ये रजा मुदतीवरील शिक्षकांचे मानधन सहा हजारांवरून 16 हजार रुपये करण्यात येईल, तसेच कायम सेवेत घेण्याबाबत नगरविकास विभागाकडून अहवाल मिळताच निर्णय घेण्यात येईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या निर्णयानंतर शिक्षकांचे चार दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्यांनी आयुक्तांसोबत चर्चा करून मागण्या सादर केल्या. या बैठकीमध्ये शिक्षकांचे या महिन्यापासूनच मानधन १६ हजार रुपये करण्याचा निर्णय झाला. तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखिल पुढील १५ दिवसांत शिक्षकांना कायम सेवेत घेण्याबाबत नगरविकास विभागाडून सकारात्मक अहवाल आणेन, असे आश्वासन दिल्याचे शिक्षक संघटनेचे सचिन डिंबळे यांनी सांगितले.