प्रेस मीडिया लाईव्ह :
डॉ. तुषार निकाळजे.
पुणे : प्रा.डॉ. सुरेश गोसावी यांची नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर नियुती झाली आहे. गेल्या वर्ष- दीड वर्ष याचा पदभार डॉ. कारभारी काळे यांचेकडे होता. डॉ. सुरेश गोसावी हे पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक आहेत.
पुणे विद्यापीठाच्या इतिहासातील भौतिक शास्त्र विषयातील प्राध्यापक व पुणे विद्यापीठाचे कुलगुरू अशा पदांवर काम करणारे डॉ. गोसावी हे चौथे तज्ञ आहेत. यापूर्वी प्रा. डॉ. राम ताकवले हे (1978 ते 1984 व 1988 ते 1989) या दोन कालावधीत कुलगुरू होते. तसेच डॉ.अरुण निगवेकर हे 1998 ते 2000 या कालावधीत पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. हे दोन्ही तज्ञ भौतिकशास्त्र विषयातील होते.तसेच याच भौतिक शास्त्र विभागातील डॉ. पंडित विद्यासागर हे नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत होते. डॉ.सुरेश गोसावी यांनी आजपर्यंत 209 शोध प्रबंध सादर केले आहेत,तसेच 24 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये सहभाग घेतला आहे, वेगवेगळ्या पुस्तकांमधील सहा प्रकरणे लिहिली आहेत. वर्ष 2014- 15 मध्ये पुणे विद्यापीठाच्या NAAC मूल्यांकनाच्या टीम मध्ये डॉ.गोसावी सरांनी मोलाची भूमिका केली आहे.त्यावेळी समन्वयक असलेले प्रा. नितीन करमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली NAAC समितीचे कामकाज डॉ.गोसावी सरांनी केले आहे. याचबरोबर राष्ट्रीय उच्च तर शिक्षण आयोग यांच्या पुणे विद्यापीठातील समितीमध्ये प्रा. नितीन करमळकर यांच्या समितीमध्ये काम पाहिले आहे. प्रा. नितीन करमळकर हे कुलगुरू असताना गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये डॉ. गोसावी यांचा सहभाग होता. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली यांचे कडून पुणे विद्यापीठात निधी उपलब्ध करून देण्यात डॉ. गोसावी यांचा मोलाचा वाटा आहे.
परंतु नवनिर्वाचित कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्यापुढे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विकास करण्याचे मोठे आव्हान आहे. कारण गेल्या पाच वर्षात विद्यापीठाचे राष्ट्रीय व जागतिक मानांकन घसरले आहे. नवीन योजना व संशोधन यामध्ये पुणे विद्यापीठ मागे पडले आहे. मार्चमध्ये झालेल्या बजेटच्या मिटिंग मध्ये 77 कोटींची तुट दाखवली आहे. याची भरपाई करण्याचे आव्हान नव्या कुलगुरूंपुढे आहे. अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष येथे गेल्या तीन वर्षात प्रलंबित असलेले लघु प्रकल्प व मोठे प्रकल्प यांना चालना देण्याची आवश्यकता आहे. कारण या विभागात पूर्ण वेळ संचालक नाहीत. त्यामुळे तिकडे दुर्लक्ष केले जाते. नुकत्याच झालेल्या रॅप सॉंग प्रकरणाची चौकशी समिती चालू आहे. अशा प्रकारच्या काही समित्यांचे अहवाल आल्यानंतर त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी या नवीन कुलगुरूंपुढे आहे. परीक्षा विभागातील कमी झालेला कर्मचारी वर्ग व त्यामुळे परीक्षा कामकाजावर होणारा परिणाम हे देखील आव्हान आहे. माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे सेवानिवृत्त झाल्यानंतर " विद्यापीठ प्रशासन अकार्यक्षम असल्याचे" म्हणाले होते.
आता या प्रशासनाचे सबलीकरण करण्याची जबाबदारी देखील आहे. यापूर्वी व्यवस्थापन परिषदेने मंजूर केलेले संशोधकांसाठीचे आर्टिकल प्रोसेसिंग फी, प्रशासकीय कामकाजातील तंत्रप्रणालीचा (आय.एस.ओ) वापर इत्यादी ठराव मंजूर होऊनही अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहेत. तीन वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठाने जम्मू-काश्मीरमध्ये सफरचंदावरील संशोधन केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली होती, तसेच एखादे गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करण्यासाठी जाहीर केले होते. परंतु त्यावर अद्याप कार्यवाही नाही.सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी व त्यामध्ये नुकतेच वगळण्यात आलेले 120 अभ्यास मंडळाचे सदस्य. डॉ. गोसावी यांना नेमणूक आदेश मिळण्याच्या चार तास अगोदर विद्यापीठातील तीन कामगार संघटनांनी एकत्र येऊन कुलगुरू कार्यालयात वेगवेगळ्या अडचणींची निवेदने दिली आहेत. विद्यार्थी हा केंद्रबिंदू म्हणून काम करताना या सर्व समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.