विविधतेत एकता या देशाचे सांस्कृतिक सामर्थ्य – मिलिंद जोशी


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वांनी जात धर्म पंथ भाषा विसरून लढले आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या सर्व निकषांवर जात, भाषा, धर्मावर भांडत बसलो तर आपल्या सर्व समावेशक संस्कृतीला मानवणार नाही. विविधतेत एकता या देशाचे सांस्कृतिक सामर्थ्य आहे. संतांनी जाती भेदाच्या भिंती नष्ट करून अध्यात्माचे लोकशाहीकरण केले, संत साहित्यातुन सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. असे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी आज काढले.  

मराठी भाषा संवर्धन समिती आणि कोहिनूर ग्रुप तर्फे बिशप थॉमस डाबरे यांना ‘कोहिनूर - मराठी रत्न’ पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद येथे देऊन गौरवण्यात आले त्यावेळी ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. आकरा हजार रुपये, पुणेरी पगडी, सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी  मंचावर बिशप थॉमस डाबरे यांसह वेदभवनचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, विशानेमा ज्ञाती समाजाचे बिपीन मोदी, संयोजक मराठी भाषा संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रवीण प्र. वाळिंबे उपस्थित होते.  .

प्रारंभी युवा कीर्तनकार तन्मयी मेहेंदळे यांनी भूप रागावर आधारित तुकाराम महाराज यांच्यी रचना सादर केली. समितीचे अध्यक्ष व संयोजक प्रवीण प्र. वाळिंबे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले, गेली १४ वर्षे बिशप थॉमस डाबरे यांनी पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर पासून कर्नाटकातील होटगी येथ पर्यंतच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात बिशप म्हणून केलेले कार्य आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्यांच्यावर केलेली पीएचडी यानिमित्त आज ‘कोहिनूर - मराठी रत्न’ पुरस्कार देऊन त्यांना गौरवले गेले आहे. यावेळी विशानेमा ज्ञाती समाजाचे बिपीन मोदी यांनी गुजराथी वैष्णव समाजातर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन बिशप यांचा गौरव केला.  तसेच विविध संस्थांनी बिशप थॉमस डाबरे यांचा सत्कार केला. 

मिलिंद जोशी पुढे म्हणाले की, धर्मामुळे भावना भडकणार नाहीत याची जबाबदारी सर्वच धर्मधुरीणांनी घेतली पाहिजे आणि धर्माचे खरं तत्वज्ञान सर्वांना समजावून सांगितले पाहिजे, धर्माचे खरे काम माणसांना जोडण्याचे असून तोडण्याचे नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. 

सत्काराला उत्तर देताना बिशप थॉमस डाबरे म्हणाले की, आपण प्रत्येकाने सर्वच धर्मांचा वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास केला पाहिजे त्यामुळे सर्वच धर्मांबद्दल आपल्या मनात आदर वाढतच राहील आणि पूर्वग्रह, दूराग्रह दूर होतील. असे सांगून ते म्हणाले की, धर्माधर्मांमध्ये सलोखा वाढवण्यासाठी मी माझी सारी हयात घालवली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यावर मी पीएचडी केली त्यानिमित्त महाराष्ट्र सरकारने संत तुकाराम महाराज यांचा विषयक समितीवर माझी नेमणूक केली होती हा मी माझा मोठा बहुमान मानतो. आज सगळीकडेच स्थानिक संस्कृतीवर गंडांतर आले आहे. सांस्कृतिक साम्राज्यवाद फोफावत आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण होत आहे. आपल्याकडे ही पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण होत आहे. या पार्श्वभूमीवर आपली भारतीय संस्कृती आणि मराठी संस्कृती कशी वृद्धिंगत होत राहील यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे ते म्हणाले. 

याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले की, बिशप थॉमस डाबरे हे खऱ्या अर्थाने ‘कोहिनूर’ आहे. सर्वधर्म समभावची संस्कृती या बरोबरच शिक्षण आणि आरोग्य यावर त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना वेदभवनाचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी म्हणाले की, या सत्कार समारंभात धर्माच्या भिंती नाहीत. त्यांनी केलेले सेवा कार्य आणि धार्मिक सलोख्याचे कार्य याचा हा सत्कार आहे.   

याप्रसंगी विशानेमा ज्ञाती समाजचे बिपीन मोदी यांनी बिशप थॉमस डाबरे यांच्या गौरव म्हणजे सेवा आणि सलोखा या मूल्यांचे गौरव आहे असे ते म्हणाले. कलकत्त्याचे फिलीप यांनी देखील भाषणातून त्यांना शुभेच्छा दिला. 

नीलिमा बोरवणकर यांनी सूत्रसंचालन केले. समारंभास मोठी गर्दी होती. श्रुती तिवारी यांनी आभार प्रदर्शन केले. 


फोटो ओळ : मराठी भाषा संवर्धन समिती आणि कोहिनूर ग्रुप तर्फे ‘कोहिनूर - मराठी रत्न’ पुरस्कार बिशप थॉमस डाबरे यांना देण्यात आला. त्यावेळी (डावीकडून) संयोजक प्रवीण प्र. वाळिंबे, विशानेमा ज्ञाती समाजाचे बिपीन मोदी, कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, बिशप थॉमस डाबरे, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, वेदभवनचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी, सूत्रसंचालक नीलिमा बोरवणकर. 




Post a Comment

Previous Post Next Post