राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आम आदमी पार्टीतर्फे कोथरूड येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे अनावरण

कोथरुड येथील हॉटेल कोकण एक्सप्रेस चौकाला राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौक नाव देण्याची आम आदमी पार्टीची मागणी

छत्रपती शाहू महाराजांची शैक्षणिक क्रांती आम आदमी पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवणार : प्रा सुहास पवार


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : 26 जून अर्थात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस हा सामाजिक न्याय दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधून आम आदमी पार्टी कोथरूड टीम व प्रा सुहास पवार (उपाध्यक्ष कोथरूड विधानसभा) यांच्या पुढाकाराने हॉटेल कोकण एक्सप्रेस चौकामध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.

 यावेळी या चौकाला राजश्री छत्रपती शाहू महाराज चौक असे नाव देण्याची मागणी आम आदमी पार्टी तर्फे पुणे महानगरपालिकेकडे करण्यात आली. यावेळी आम आदमी पार्टीचे प्रा. शाहीर बाबासाहेब जाधव हे प्रमुख पाहुणे, आयोजक प्रा सुहास पवार यांच्या सहित ज्योती ताकवले, आरती करंजावणे, संदीप घाडगे, अभिजीत परदेशी, अमोल काळे, जीवन रामतीर्थे, निलेश वांजळे, सुशील बोबडे, अविनाश सावंत, रोहन रोकडे हे उपस्थित होते. 

आम आदमी पार्टी ही सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी वचनबद्ध असून दिल्ली व पंजाब येथील आपच्या सरकारने जनतेला मोफत शिक्षण, आरोग्यसेवा, वीज, पाणी, बससेवा, शेतकऱ्यांना हमीभाव, बेरोजगारांना रोजगार मिळावा देण्यासाठी यशस्वी कार्य केले आहे. छत्रपती शाहू महाराजांची शैक्षणिक क्रांती आम आदमी पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवणार असे मनोगत प्रा सुहास पवार यांनी यावेळी व्यक्त केले. 

समाजातल्या वंचित, शोषित घटकांबद्दलची आस्था हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच एक वेगळेपण. समाजातल्या सर्व घटकांना एकत्र आणण्याचं काम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलं. सत्तेचा उपयोग राजविलासासाठी न करता ती सत्ता सर्वसामान्य, कष्टकरी, बहुजन जनतेच्या उद्धारासाठी वापरून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी एक आदर्श घालून दिला.

छ्त्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी समाजाला  विभाजित करणाऱ्या, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या सर्व अनिष्ट प्रथा आणि व्यवस्थांच्या मुळाशी जाऊन त्यांची उत्तरं शोधण्याचा, त्यांना मानवी पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर संस्थानातील नोकऱ्यांमध्ये मागास जाती जमातींसाठी 50% आरक्षण महाराजांनी ठेवले. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी अनेक शाळा, कॉलेजेस, रात्र शाळा व वसतिगृहांची स्थापना केली. आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा त्यांनी केला आणि जातीभेद निर्मूलनाचा नारा दिला.  

छत्रपती शाहू महाराजांनी आपली ताकद, संसाधने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभी केली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरमध्ये अखिल भारतीय बहिष्कृत समाजाची पहिली परिषद आयोजित केली, त्यावेळी छत्रपती शाहू महाराज यांनी त्या परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. 

छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा वारसा जपण्याचा निर्धार यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post