शिक्षकांच्या या आंदोलनात मी शेवटपर्यंत सोबत राहीन ही एक सामाजिक लढाई आहे..
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची रात्री नऊ वाजता भेट घेतली. आंदोलन स्थळावरून त्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तो होऊ शकला नाही. शिक्षकांच्या या आंदोलनात मी शेवटपर्यंत सोबत राहीन ही एक सामाजिक लढाई आहे. उच्च न्यायालयाच्या निकालाच्या अंमलबजावणी करीता प्रसंगी कायदेशीर मदत करू असे आश्वासन खासदार सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना दिले.
या आंदोलन करणाऱ्या मध्ये महिला शिक्षिका आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांसोबत संवाद साधताना अनेक महिला शिक्षकांना अश्रू अनावर झाले. रामाचाही वनवास 14 वर्षानंतर संपला होता. मग आमच्यावरच अन्याय का, मला न्याय मिळवून द्या. अन्यथा उपोषणाची लढाई आणखी तीव्र करू, अशा भावना यावेळी आंदोलनकर्त्या शिक्षकांनी खासदार सुळे यांच्यासमोर व्यक्त केल्या.पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील 93 शिक्षक महापालिका सेवेत कायम करा या मागणी करता महापालिकेसमोर गेले तीन दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. सदर 93 शिक्षकांना सेवेत कायम करून वेतनाचा फरक अदा करा असा निकाल शिक्षकांच्या बाजूने उच्च न्यायालयाने फेब्रुवारी 2023 मध्ये दिलेला आहे. मात्र चार महिन्यानंतरही उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी पुणे महानगरपालिका प्रशासनाने न केल्यामुळे शिक्षक आंदोलनाला बसलेले आहेत.