प्रशासना तर्फे पारंपरिक पद्धतीने स्वागत
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : पुणे येथे १२ ते १४ जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या डिजीटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी विविध देशांच्या सुमारे ५० प्रतिनिधींचे रविवारी सायंकाळपर्यंत लोहगाव विमानतळावर आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व प्रतिनिधीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
आगमन झालेल्या प्रतिनिधींमधे ऑस्ट्रेलिया, केनिया, श्रीलंका, ओमान, नायजेरिया, सिंगापूर, इंडोनेशिया, रशिया, मॉरीशस, इंग्लंड, लाओस या देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वित्तीय विकास आणि अर्थव्यवस्थेला स्थिरता देण्यासाठी महत्वाच्या असलेल्या जागतिक संस्थांच्या प्रतिनिधींचाही यात समावेश आहे.
आगमनप्रसंगी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रतिनिधींचे पुणेरी पगडी घालून आणि शाल देऊन स्वागत करण्यात आले. ढोल ताशाच्या गजरात आणि तूतारीच्या निनादात पारंपरिक पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत करतांना खास महाराष्ट्राच्या संस्कृतीचेही पाहुण्यांना दर्शन घडविण्यात आले. स्वागतासाठी पुणे महानगरपालिका उपायुक्त डॉ.चेतना केरुरे, राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार उपस्थित होते.
बैठकीसाठी येणाऱ्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी प्रशासनाने जय्यत तयारी तयारी केली आहे. भरजरी पोशाखात ढोल ताशा पथक, तूतारी वादाक ठेवण्यात आले आहे. जी-२० परिषदेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेचे आणि स्वागतपर संदेशाचे फलक सर्वत्र प्रदर्शित करण्यात आले आहे.
’नमस्ते इंडिया’म्हणून पाहुण्यांचा प्रतिसाद
‘डिजीटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप’च्या बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांचे पुणे येथे आज सायंकाळी आगमन झाले. याप्रसंगी प्रशासनाच्यावतीने त्यांचे पुणेरी पगडी, शाल देऊन स्वागत करण्यात आले.